वडवणी : वडवणी पोलिसांनी धाडस, प्रसंगावधान आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गोतस्करीचा मोठा डाव उधळून लावत तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. म

वडवणी : वडवणी पोलिसांनी धाडस, प्रसंगावधान आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर गोतस्करीचा मोठा डाव उधळून लावत तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने पळणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. पोलिसांनी या कारवाईत दोन गोवंशीय जनावरांची सुखरूप मुक्तता केली.
पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न
वडवणी शहरात १४ जूनच्या रात्री ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत विशेष नाकाबंदी सुरू असताना पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच-०४ सीडी-९८३५) पोलिसांना आढळली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिसांच्या वाहनाला कट मारत बीडकडे पळ काढला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी पुढील नाकाबंदी पथकांना सतर्क केले. जगताप पेट्रोलपंपाजवळील पुलावर वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वतःचा बचाव करत पाठलाग सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक श्याम गायकवाड यांच्या पथकाने हॉटेल प्रतीक्षा परिसरात कार ओव्हरटेक करून थांबवली; मात्र अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून गेले.
कारमध्ये क्रूरपणे कोंडली होती जनावरे
पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता, त्यात दोन गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरपणे बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्यांची सुटका करून सुरक्षित ठिकाणी हलवले. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
लातूरमधून तिघांना ठोकल्या बेड्या
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे व लातूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २१ जून रोजी लातूर जिल्ह्यातील लामजना (ता. औसा) येथे धाड टाकून आमिर आसिफ सुर्वे (वय २६), आमेर शब्बीर मेमन (वय ३५) आणि शाहेद अन्वर बिरादार (वय ३३) यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि अप्पर पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी पोलिसांच्या पथकाने यशस्वी केली.

COMMENTS