बीड: शेतकरी, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि भ्रष्टाचार निर्मूलन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून अनोख्या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे सर्वस

बीड: शेतकरी, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि भ्रष्टाचार निर्मूलन अशा विविध सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून अनोख्या लक्ष्यवेधी आंदोलनाद्वारे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भिड सामाजिक योद्धा पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव
युवा लोकमित्रच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. २० जून रोजी बीड येथील बार्शी नाक्यावरील ताज पॅलेस येथे एका भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे, ज्येष्ठ पत्रकार भागवत तावरे, रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत आणि पत्रकार संघाचे वैभव स्वामी यांच्या हस्ते डॉ. गणेश ढवळे यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी त्यांच्या सामाजिक आंदोलनातील सहकारी शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, बाळासाहेब मोरे पाटील, किष्किंधा पांचाळ, रामधन जमाले आणि धनंजय सानप प्रामुख्याने उपस्थित होते.
हा सन्मान चळवळीतील सहकाऱ्यांच्या संघर्षाचे फळ: डॉ. गणेश ढवळे
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, “हा सन्मान केवळ माझा एकट्याचा नसून, सामाजिक चळवळीत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सर्व सहकार्यांच्या संघर्षाचे आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे फळ आहे.” डॉ. गणेश ढवळे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS