अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यातील येथील भोंदूबाबा म्हणून चर्चेत आलेला, तसेच लैगिंक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल

अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यातील येथील भोंदूबाबा म्हणून चर्चेत आलेला, तसेच लैगिंक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता न्यायालयात दाखल असलेल्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या सुनावणीदरम्यान आरोपीची पत्नी कल्पना खरात हिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करताना पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःचा संबंध नसल्याचा ठाम दावा केला. या भूमिकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी सविस्तर युक्तिवाद मांडण्यात आले. कल्पना खरात ही 31 मार्चपासून शोधात असल्याचे नमूद करण्यात आले होते. तिच्यावर पतीच्या आर्थिक व जमीन व्यवहारांमध्ये सहभागाचा आरोप आहे. मात्र, तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, संबंधित व्यवहारांमध्ये तिची कोणतीही थेट भूमिका नव्हती. बँक खात्यांवरील व्यवहार पती अशोक खरात स्वतः पाहत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण पक्षाने फिर्यादीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. कथित व्यवहारानंतर बराच काळ उलटून गेल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तसेच, जमीन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, असे सांगत हा वाद नंतर निर्माण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. संबंधित बैठकींना कल्पना खरात उपस्थित नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारी बाजूने या दाव्यांना ठाम विरोध दर्शविला. कल्पना खरात हिच्या बँक खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. जमीन खरेदीसंदर्भातील कागदपत्रांवर तिची सही व अंगठा असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले. तसेच, व्यवहारांसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत पत्रांमध्ये व्याजदर ठरविण्याच्या निर्णयात तिची संमती असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. त्यामुळे ती संपूर्णपणे अनभिज्ञ होती, हा दावा ग्राह्य धरता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. एका बाजूला पत्नीने स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला असताना, दुसरीकडे सरकारी यंत्रणा तिच्या सहभागाचे पुरावे मांडत आहे. न्यायालय या सर्व मुद्द्यांचा सखोल विचार करून पुढील निर्णय देणार असून, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.कल्पना खरातच्या खात्यांतून सात कोटींचे व्यवहार तपास यंत्रणेने सादर केलेल्या माहितीनुसार, कल्पना खरात हिच्या खात्यांमधून सुमारे सात कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. कोणतेही स्थिर उत्पन्नाचे साधन नसताना एवढ्या मोठ्या रकमेची उलाढाल कशी झाली, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच, कुटुंबाच्या मालमत्तेत तिचा मोठा हिस्सा असल्यामुळे या व्यवहारांची माहिती तिला असणे स्वाभाविक असल्याचेही तपास अधिकार्यांनी सांगितले.

COMMENTS