मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ न
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर राज्यातील सत्तासमीकरणांबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्कांना उधाण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर तसेच भविष्यातील संभाव्य राजकीय सहकार्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील कोणत्याही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही खासदार आणि आमदार विरोधी बाकांवर असल्याने मतदारसंघांतील विकासकामांबाबत त्यांच्यावर वाढता दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भविष्यात सत्ताधारी आघाडीसोबत काही प्रकारचे सहकार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत अधिकृतपणे जाण्याचा निर्णय घेतल्यास सत्तेतील सहभागाचे स्वरूप काय असू शकते, याबाबत प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच सत्तेत प्रत्यक्ष सहभागी न होता बाहेरून पाठिंबा देण्याच्या पर्यायावरही विचारविनिमय झाल्याची चर्चा आहे. मात्र या दाव्याला कोणत्याही पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशीही संवाद साधल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे मानले जात आहे.
रोहित पवार यांनी अफवा फेटाळल्या
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांबाबत पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अशा प्रकारची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात किंवा केंद्रातील कोणत्याही स्तरावर अशा प्रकारचा निर्णय अथवा चर्चा सुरू नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहू, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
चर्चा सुरू असल्याची माहिती खरी : वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, चर्चा करण्याला अर्थ नाही, मात्र चर्चा सुरू आहे. कोणता मार्ग स्वीकारायचा, हा संबंधित पक्षाचा निर्णय आहे. वैचारिक भूमिका कायम ठेवायची की सत्तेच्या राजकारणाला प्राधान्य द्यायचे, हे त्यांनी ठरवायचे आहे, असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी प्रामाणिक राहायचे की सत्तेच्या राजकारणाचा मार्ग स्वीकारायचा, हा निर्णय संबंधित पक्षाने घ्यायचा आहे.

COMMENTS