बीड येथील आदर्श नगर परिसरातील उमाकिरण एज्युकेशनल संकुलातील जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये आयोजित ‘कौतुकायन 2026’, कॉम्रेड्स मॅरेथॉन रनर्स गौरव समारंभ

बीड येथील आदर्श नगर परिसरातील उमाकिरण एज्युकेशनल संकुलातील जोशीज् मॅथ्स क्लासेसमध्ये आयोजित ‘कौतुकायन 2026’, कॉम्रेड्स मॅरेथॉन रनर्स गौरव समारंभ आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार हे तीनही कार्यक्रम विद्यार्थी, पालक, शिक्षक, मान्यवर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, आंतरराष्ट्रीय स्तरावर बीडचे नाव उज्ज्वल करणार्या धावपटूंचा गौरव आणि उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन अशा त्रिसूत्रीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. सुनील जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत यश मिळविण्यावर न थांबता उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या गौरव समारंभात दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन (87 कि.मी.) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून बीड जिल्ह्याचा आणि देशाचा गौरव वाढविणार्या धावपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये शरद खिल्लारे, मेजर प्रभाकर जाधव, कल्याण कुलकर्णी, हरी ठोंबरे आणि डॉ. अमोल मोराळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी या धावपटूंनी विद्यार्थ्यांना जिद्द, शिस्त, सातत्य, कठोर परिश्रम आणि ध्येयपूर्तीसाठी चिकाटी ठेवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. यानंतर ‘कौतुकायन 2026’ अंतर्गत जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड, एमएचटी-सीईटी, महाराष्ट्र राज्य मंडळ (एचएससी), व्हीआयटीईई तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये मोहम्मद अस्लम, प्रशांत लोणकर, प्रतिक कंठक, श्रीकांत खराडे, जयदीप जानवळे, रुग्वेद धसे, मयुरेश जोशी, धनंजय माने, अभिषेक आमटे, करण कांगडे, वैभवी थिगळे, अंकिता काळे, आदित्य धसे, अमर कदम, जिशान पटेल, कृपा मंत्री, अभिनव वाघमारे, आदिती शिंदे, यश सौंदलकर, सुमित सोनवणे, तन्मय बोंडगे, शेख शाद, संस्कार काजळे, वैष्णवी कोल्हे, शरयू गिरे, सांची कांबळे, सचिन जगदाळे, प्राप्ती खरात, पूनम गावडे, प्रतिक पवार, मिर्झा अफीफ मन्सूर, नवनाथ डिसले, ओंकार शेजूळ आणि महेश डिसले या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारमध्ये प्रा. सुनील जोशी यांनी इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, आर्किटेक्चर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एमएचटी-सीईटी कॅप प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, मेरिट लिस्ट, कट-ऑफ, ऑप्शन फॉर्म भरण्याची योग्य रणनीती, महाविद्यालयाची निवड, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक कर्ज आणि भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. उपस्थित विद्यार्थी व पालकांनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष रो. विकास उमापूरकर, सचिव रो. सुमित जयस्वाल, निर्वाचित अध्यक्ष सीए श्रीगोपाल लड्डा आणि निर्वाचित सचिव रो. सुहास बेदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सुनील जोशी यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक आणि सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वप्नातील करिअर निश्चित घडवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS