अजिंठा लेणी, जागतिक कीर्तीची निशाणी, महाराष्ट्राचा अभिमान, आणि देशाच्या सांस्कृतिक वारशाचा अपूर्व ठेवा. पण या ऐतिहासिक ठिकाण

अजिंठा लेणी, जागतिक कीर्तीची निशाणी, महाराष्ट्राचा अभिमान, आणि देशाच्या सांस्कृतिक वारशाचा अपूर्व ठेवा. पण या ऐतिहासिक ठिकाणी सध्या जे घडत आहे, ते फक्त सुरक्षा अपयश नाही; ते आर्थिक आणि व्यवस्थापनाकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. गेल्या दोन महिन्यांत मधमाशांच्या पाच हल्ल्यांनी ११ पर्यटकांना जखमी केले, अजिंठा लेणीत बुधवारी पर्यटकांना मधमाशांच्या भयावह हल्ल्याचा सामना करावा लागला. पर्यटकांची मोठी वर्दळ असताना एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. पहिली घटना सकाळी लेणी क्रमांक १० जवळ घडली, जिथे मोहळातून अचानक बाहेर पडलेल्या मधमाशांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या घटनेचा थरार संपत नाही तोच, तासाभराच्या अंतराने लेणी क्रमांक २६ परिसरात दुसऱ्यांदा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुहेरी संकटामुळे पर्यटकांची प्रचंड धावपळ उडाली आणि अनेक पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. प्रश्न असा आहे की, या जागेवर ठिकाणी येणारे पर्यटक हे केवळ भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात या जागतिक हेरिटेज असणाऱ्या स्थळाला भेट देतात. देशाला परकिय चलन मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र तर आहेच; परंतु, त्याच बरोबर देशाचे अतिशय उच्च दर्जाचे सांस्कृतिक आणि शिल्पकलेचे अत्युच्च स्थळ ही आहे. अजिंठा सारख्या जागतिक स्थळावरून देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात परकीय चलन येते. परंतु प्रशासन आणि हेरिटेज विभाग अजूनही इतके निष्काळजीपणा का करताहेत? सुरक्षा उपाययोजना, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित स्टाफ असणं हे मूलभूत नियम आहेत. तरीसुद्धा, या सर्वांमध्ये ढिलाई आणि संताप आणणारे नियोजन दिसते.
हे दुर्लक्ष फक्त आर्थिक नुकसान निर्माण करत नाही; ते देशाच्या पर्यटन ब्रँडिंगला हानी पोहचवते. परकीय पर्यटक जर सुरक्षिततेची खात्री नसेल तर, आपल्या अनुभवावरून ते नकारात्मक मत पसरवतील, याचे भान कुणाला आहे की नाही! देशाच्या पर्यटन क्षेत्राला त्याचा थेट फटका बसतो. आणि हे परिणाम परकीय चलनावरही स्पष्टपणे दिसतात. म्हणजेच, हेरिटेज वास्तू संरक्षण विभागाचा हा हलगर्जीपणाच म्हणायचा ज्यामुळे फक्त पर्यटकांना धोका नाही, तर देशाच्या परकीय चलनावर ही हा हल्ला ठरेल! अजिंठा लेणीसारख्या जागतिक स्थळाला संरक्षण फक्त भिंतींवर नाही; त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या सुरक्षिततेवर दिसणे आवश्यक आहे. प्रशासनाने फक्त सुरक्षा नियमांची नावेच काढायची नाहीत, तर प्रत्यक्षात सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करावी, मधमाशांच्या वसाहतींचे व्यवस्थापन करावे, आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा निर्माण करावी. निष्काळजीपणामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र हे दोन्ही धोक्यात आले आहेत. प्रशासनाने आता फक्त जागे होऊन सूचना देण्यापुरते काम थांबवून, जबाबदारी स्वीकारावी. कारण जागतिक कीर्ती आणि आर्थिक लाभ दोन्ही जपण्यासाठी ही वेळ फार महत्त्वाची आहे. नाहीतर ‘जागतिक वारसा’ हा शब्द फक्त कागदोपत्री ठरेल.
याहून गंभीर बाब म्हणजे, या घटनांनंतरही स्पष्ट आणि ठोस कृती आराखडा दिसत नाही. मधमाशांच्या हल्ल्यांचा धोका ओळखून, तज्ज्ञांच्या मदतीने दीर्घकालीन उपाययोजना का आखल्या जात नाहीत? पर्यटकांना पूर्वसूचना देण्यासाठी योग्य सूचना फलक, प्रशिक्षित कर्मचारी, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, या सगळ्या गोष्टी इतक्या कठीण आहेत का? की प्रशासनाला त्यासाठी वेळच नाही? हा प्रश्न फक्त मधमाशांच्या हल्ल्यांचा नाही; हा प्रश्न आहे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा, कार्यक्षमतेचा आणि जबाबदारीचा. अजिंठा लेणींचा वारसा जपायचा असेल, तर तो फक्त भिंतींवर नाही, तर त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सुरक्षिततेत दिसला पाहिजे. अन्यथा, ‘जागतिक वारसा’ हा किताब केवळ नावापुरताच उरेल, आणि प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण बनून राहील.
गेल्या अवघ्या ६० दिवसांत मधमाशांच्या हल्ल्याची ही पाचवी वेळ असून, वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पर्यटकांमध्ये, विशेषतः महिला आणि बालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारो पाऊले पडणाऱ्या या पर्यटनस्थळी सुरक्षेसाठी तैनात असलेली यंत्रणा या मधमाशांसमोर हतबल ठरत आहे. जागतिक दर्जाचे केंद्र असूनही ‘भारतीय पुरातत्व विभाग’ आणि पर्यटन विभाग कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असा संतप्त सवाल आता पर्यटकांकडून विचारला जात आहे. केवळ थातूरमातूर उपाय न करता, या मोहळांचा सुरक्षित बंदोबस्त करण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. वारंवार होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे अजिंठ्याच्या जागतिक प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS