Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस ठाण्यातच कायद्याला आव्हान! ‘तलवार बाबा’ समर्थकांचा धुडगूस, अधिकार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

नांदेड : बिलोली तालुक्यातील बडूर येथील भोंदू म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ‘तलवार बाबा’ प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. जादूटोणा विरोधी कायद्यांत

शून्य सावली दिवस : वैज्ञानिक घटना समजून घ्या; अंधानुकरण टाळा – डॉ. वैद्य
मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना कटीबद्ध-खा. ज्योतीताई वाघमारेसंध्याताई फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन महिलांचा सन्मान

नांदेड : बिलोली तालुक्यातील बडूर येथील भोंदू म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ‘तलवार बाबा’ प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, आरोपीच्या समर्थकांनी थेट बिलोली पोलीस ठाण्यात घुसून उघड दादागिरी करत कायद्यालाच आव्हान दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
ज्ञानेश्वर नागोराव करडे उर्फ ‘तलवार बाबा’ हा अंगात येण्याचा बनाव करून आणि तलवारीचा धाक दाखवून गोरगरीब नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारींवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. 29 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, वातावरण अचानक तणावपूर्ण बनले. यावेळी आरोपीचे समर्थक शिवकांत शिवराम मैलारे आणि नबाजी बाबा वाघेकर यांनी पोलीस ठाण्यात घुसून अधिकार्‍यांना जाब विचारण्याच्या नावाखाली गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुम्हाला गुन्हा दाखल करण्याचा अधिकार कोण दिला? असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या कामात उघड अडथळा निर्माण केला. इतकेच नव्हे, तर पोलीस कर्मचारी माधव तोटेवाड यांनी लिहिलेली फिर्याद हिसकावून घेऊन ती फाडून टाकण्यात आली-ही घटना पोलीस यंत्रणेलाच थेट आव्हान देणारी ठरली. प्रकरण इथेच थांबले नाही. शिवकांत मैलारे याने पोलीस निरीक्षक शिवराज लोखंडे यांची कॉलर पकडत त्यांच्याशी धक्काबुक्की केली, तर नबाजी वाघेकर याने पोलिसांना ढकलून खाली पाडले. या गोंधळात स्वतः ‘तलवार बाबा’ ज्ञानेश्वर करडे यानेही आपल्या समर्थकांना या साहेबांना सोडू नका अशी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या झटापटीत पोलीस कर्मचार्‍यांच्या गणवेशाची बटणे तुटली असून, तुला एकट्यात गाठून बघून घेतो अशा थेट जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. पोलीस ठाण्यातच अधिकार्‍यांवर हात उचलण्यापर्यंत आरोपींची मजल गेल्यामुळे कायद्याचा धाक कमी होत चालल्याचे चित्र उघड झाले आहे. विशेषतः शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करत पोलिसांवरच दबाव टाकण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कठोर पावले उचलत शिवकांत मैलारे, नबाजी वाघेकर आणि ज्ञानेश्वर करडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 221, 121(1), 49 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, ‘तलवार बाबा’च्या नावाने परिसरात निर्माण झालेली दहशत आणि त्याच्या समर्थकांची आक्रमकता यामुळे बिलोली तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस ठाणेही सुरक्षित नसल्याचे या घटनेने अधोरेखित झाले असून, शासकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकूणच, अंधश्रद्धा आणि दादागिरी यांच्या संगनमतातून कायद्यालाच आव्हान देण्याचा हा प्रकार असून, प्रशासनाने यावर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

COMMENTS