Homeताज्या बातम्या

विजेच्या लपंडावाने नांदेडकरांना हैराण; महावितरणचा भोंगळ कारभार, नागरिक आंदोलनाच्या तयारीत

जुने ट्रान्सफॉर्मर, वाढता भार, निकृष्ट साहित्य आणि कंत्राटदारांची मनमानी; शहरातील वसाहतींमध्ये संतापाची लाट नांदेड : नांदेड शहरातील विविध वसाह

ऑनलाइन औषध विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊलखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर लाखो शिवभक्त उपस्थित राहणार : माधवराव देवसरकर
कारवाईचा देखावा की प्रशासनाचे अपयश? नायगावात वाळूमाफियांचा पुन्हा हैदोस
Worker dies of electric shock while working on electric poll in Nanded |  Nanded : विजेच्या धक्क्याने वीज वितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू; मृतदेह बराच वेळ  खांबावर लोंबकळत

जुने ट्रान्सफॉर्मर, वाढता भार, निकृष्ट साहित्य आणि कंत्राटदारांची मनमानी; शहरातील वसाहतींमध्ये संतापाची लाट

नांदेड : नांदेड शहरातील विविध वसाहतींमध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या सततच्या वीजखंडतीमुळे (लोडशेडिंग) नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रात्री कधीही अचानक वीज गायब होणे, दोन ते तीन तासांनंतर पुरवठा पूर्ववत होणे आणि पुन्हा मध्यरात्री अथवा पहाटे वीज खंडित होणे, असा विजेचा लपंडाव सातत्याने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, वाढत्या उकाड्यात आणि पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांची झोप उडाली असून महावितरणच्या विरोधात आंदोलन छेडण्याची तयारी विविध भागांमध्ये सुरू झाली आहे.

शहरातील नवीन वसाहती, विस्तारित भाग आणि लोकसंख्या वाढलेल्या परिसरांमध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढत्या भाराचा अभ्यास करून आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची जबाबदारी असलेल्या महावितरणकडून कोणतेही व्यापक सर्वेक्षण करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक भागांमध्ये दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरवरच (रोहित्रे) वाढलेला भार टाकला जात असल्याने वारंवार बिघाड होत असून त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे अनेक ट्रान्सफॉर्मर वर्षानुवर्षे योग्य देखभाल आणि दुरुस्तीअभावी जीर्ण अवस्थेत आहेत. प्रतिबंधात्मक दुरुस्तीऐवजी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यानंतरच त्याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे एखाद्या भागात ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अनेक तास किंवा काही वेळा संपूर्ण दिवस नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. वाढत्या डिजिटल युगात वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेले व्यवसाय, लहान उद्योग, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि घरातील दैनंदिन कामे विस्कळीत होत आहेत.

महावितरणला पुरविण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाचे केबल्स, फ्युज, डीपी बॉक्स आणि इतर साहित्याचा वापर होत असल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याची चर्चा वीज ग्राहकांमध्ये आहे. परिणामी एका भागातील दुरुस्ती पूर्ण होत नाही तोच दुसऱ्या भागात बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. लाखो रुपयांचा खर्च करूनही दर्जेदार आणि स्थिर वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. दरम्यान, दुरुस्ती आणि देखभालीची बहुतांश कामे खाजगी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आल्याने परिस्थिती आणखी बिघडल्याचे बोलले जात आहे. पूर्वी महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी प्रत्यक्ष नियंत्रण ठेवत असत. मात्र, खाजगीकरणाच्या धोरणानंतर कामाचा दर्जा, वेळेवर दुरुस्ती आणि जबाबदारी यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण कमी झाल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदार आणि गुत्तेदारांच्या मनमानीमुळे नागरिकांना तासन् तास विजेविना राहावे लागत असून तक्रारीनंतरही तात्काळ प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरा वीज खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इन्व्हर्टर आणि जनरेटरचा आधार घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी सर्वसामान्य कुटुंबांसाठी तो खर्च परवडणारा नाही. दुसरीकडे वीजबील वेळेवर न भरल्यास ग्राहकांवर तात्काळ कारवाई करणाऱ्या महावितरणकडून मात्र दर्जेदार सेवा देण्याबाबत उदासीनता दिसून येत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रारही सातत्याने पुढे येत आहे. तांत्रिक बिघाड झाला आहे, कर्मचारी कामावर आहेत, लवकरच वीजपुरवठा सुळीत होईल, अशी ठरलेली उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

आंदोलनाची तयारी सुरू सततच्या वीजखंडतीमुळे वैतागलेले नांदेड शहरातील विविध वसाहतींमधील नागरिक आता संघटित होत असून महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडतीला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, जुन्या ट्रान्सफॉर्मरची तात्काळ क्षमता वाढवावी, वाढत्या लोकसंख्येनुसार स्वतंत्र सर्वेक्षण करून नवीन यंत्रणा उभी करावी, निकृष्ट साहित्य पुरवणाऱ्या कंपन्यांची चौकशी करावी आणि कंत्राटदारांच्या कामकाजावर कठोर नियंत्रण आणावे, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत.

COMMENTS