नवी दिल्ली : आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रवासी सल्ला (Trave

नवी दिल्ली : आफ्रिकेतील काही देशांमध्ये इबोला संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचा प्रवासी सल्ला (Travel Advisory) जारी केला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून काँगो, युगांडा तसेच त्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये इबोला संसर्ग फैलावण्याची शक्यता अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्या किंवा सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांनी अधिक दक्षता बाळगावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, संबंधित देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आरोग्य तपासणी करून घेणे आणि संसर्गजन्य लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीने २२ मे रोजी प्रवेशबिंदूंवरील (Entry Points) तपासणी आणि रोगनियंत्रण व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या तात्पुरत्या शिफारशी जाहीर केल्या. विशेषतः ‘बुंडिबुग्यो’ (Bundibugyo) प्रकारचा विषाणू आढळलेल्या भागांमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतामध्ये अद्याप ‘बुंडिबुग्यो’ प्रकारामुळे होणाऱ्या इबोला संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून रक्तस्रावी ताप निर्माण करणारा विषाणूजन्य संसर्ग मानला जातो. या आजारामध्ये मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात असल्याने जागतिक स्तरावर सतर्कता वाढविण्यात आली आहे. सध्या या प्रकारच्या इबोला संसर्गावर प्रभावी लस किंवा निश्चित उपचार पद्धतीला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर खबरदारी हाच सर्वात प्रभावी मार्ग मानला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार या परिस्थितीला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ (PHEIC) घोषित केले होते. तसेच आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही काँगो आणि युगांडामधील इबोला उद्रेकाला खंडीय सुरक्षेशी संबंधित गंभीर आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.

COMMENTS