Homeताज्या बातम्या

योग मानवी चेतनेशी जोडणारा सेतू : पंतप्रधान मोदी

कोलकाता : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथील रेड रोड परिसरात भव्य योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजननागरिकांनी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा- जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी
उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील


कोलकाता : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथील रेड रोड परिसरात भव्य योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो नागरिकांसमवेत योगाभ्यास करून देशवासियांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राज्यपाल, विविध लोकप्रतिनिधी, मंत्री, विद्यार्थी, खेळाडू, योग साधक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची पद्धत नसून मानवी चेतना आणि आत्मजागृतीशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठ्या दिवसांपैकी एक मानला जातो. मात्र, आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक मान्यता मिळाल्यानंतर या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. आज योग दिन हा जगभरात उत्साहाने साजरा केला जाणारा एक वैश्‍विक उत्सव बनला असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या प्राचीन परंपरेतून जन्माला आलेला योग आता संपूर्ण जगाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांपासून हिंद महासागराच्या किनार्‍यापर्यंत, पूर्वेकडील प्रदेशांपासून पश्‍चिमेकडील भागांपर्यंत योगाची ऊर्जा आणि सकारात्मकता अनुभवायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना त्यांनी श्री अरबिंदो, स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण परमहंस यांच्या कार्याचे स्मरण केले. अशा महान संत, विचारवंत आणि आध्यात्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या भूमीत योग दिन साजरा करणे विशेष गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. श्री अरबिंदो यांच्या विचारांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी संपूर्ण आयुष्य योगसाधना आणि मानवी उन्नतीसाठी समर्पित केले. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर मानवी चेतनेला अधिक व्यापक आणि उन्नत स्तराशी जोडण्याचा मार्ग आहे. कोलकात्यातील नागरिकांच्या सहभागाचेही पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. योग दिनाच्या आयोजनासाठी शहरवासीयांनी स्वच्छता, शिस्त आणि नागरी जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचा उत्साह आणि सहकार्य हे समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या भाषणानंतर रेड रोड परिसरात सामूहिक योगाभ्यासाला प्रारंभ झाला. हजारो नागरिकांनी एकत्रितपणे विविध योगासनांचा सराव करत आरोग्य, मानसिक संतुलन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने पंतप्रधानांचे स्वागत करत पश्‍चिम बंगालची योग परंपरा समृद्ध असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे यंदाचा योग दिन सोहळा राज्यासाठी विशेष आणि ऐतिहासिक ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. राज्यात योगाविषयी जागरूकता आणि सहभाग वाढत असून समाजाच्या सर्व स्तरांमध्ये योगाबद्दलचा उत्साह अधिक बळकट होत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
योग एक दिवसापुरता मर्यादित नसावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा; तो दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. ते म्हणाले की, योग निरोगी जीवन जगण्यास मदत करतो आणि मानसिक व शारीरिक आरोग्य कसे टिकवायचे याचा मार्ग दाखवतो. योग जीवनशैलीत संतुलन आणतो आणि वाढत्या वयातही व्यक्तीला उत्साही ठेवतो, असे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

COMMENTS