Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरीचा शाही विवाह थाटात

म्हसवड / वार्ताहर : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्

फलटणमध्ये वाळू वाहतुक तस्करावरावर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
बाल हत्याकांडातील गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप
बँकेच्या अधिकार्‍याकडून दरोड्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर डल्ला

म्हसवड / वार्ताहर : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12 वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपारिक पध्दतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत थाटात झाला.
तब्बल महिनाभर चालणार्‍या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी कृष्णाजी गुरव यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर 12 दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले.
या सोहळ्यासाठी पहाटेपासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते. अशी अख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे. या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी वर सज्ज झाला. यावेळी राजेंद्र वामनराव राजेमाने यांचा मानाचा पोषाख श्रीं ला घातला गेला.
नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील मोकळ्या मैदानात पंचक्रोशीतील, खेड्या-पाड्यातील भाविकांचा गजी-ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरु होता.
श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकर्‍यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभार्‍यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभार्‍यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत होते. सालकर्‍यांसह श्रींची मूर्ती आतील गाभार्‍यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होते. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरु होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभार्‍यात नेण्यात आली. त्यानंतर जोगेश्‍वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने, विधीपूर्वक, पिंटू पाठक, प्रज्योत पाठक आदी पुरोहितांमार्फत मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री 12 वाजता सनई-चौघडा, ढोल-ताशा, बँड, गजी झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या थाटात झाला. पारंपारिक रिवाजानुसार श्रींच्या विवाहसोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह झाला.

COMMENTS