अहिल्यानगर : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लाल टाकी येथील हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्

अहिल्यानगर : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लाल टाकी येथील हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच कामगार हक्कांसाठी लढा देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने वातावरण देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण झाले होते. “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष दीपक दांगट, संदीप चौधरी, तुषार हिरवे, विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव, तसेच गणेश शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी उपस्थितांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान आणि कामगार चळवळीतील संघर्ष यांची आठवण करून दिली.यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वाभिमानाचा महाराष्ट्र दिला आहे. हा महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमा नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदू आहे. आजच्या पिढीने या लढ्याचा इतिहास केवळ पुस्तकात वाचून न थांबता तो आपल्या विचारांमध्ये आणि कृतीत उतरवणे आवश्यक आहे. राशिनकर पुढे म्हणाले, “कामगारांच्या कष्टातून उभा राहिलेला हा महाराष्ट्र आहे. उद्योग, शेती, बांधकाम, सेवा क्षेत्र अशा प्रत्येक क्षेत्रात कामगारांनी आपल्या घामाचे आणि श्रमाचे योगदान दिले आहे. त्यामुळे कामगार दिन साजरा करताना त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याची आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, ही काळाची गरज आहे. त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढा देणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल.जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आपल्या भाषणात कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, कामगार दिन हा केवळ एक उत्सव नसून तो श्रमिकांच्या संघर्षाची आणि त्यागाची जाणीव करून देणारा दिवस आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाच्या प्रगतीत कामगारांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या श्रमांमुळेच देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. त्यामुळे कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आपणही सामाजिक बांधिलकी जपत कामगारांच्या हक्कांसाठी सजग राहिले पाहिजे.” त्यांनी कार्यकर्त्यांना संघटित राहून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदेशाचाही संदर्भ देण्यात आला. त्यांच्या संदेशात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देत मराठी माणसांनी आपल्या इतिहासाचा विसर पडू देऊ नये, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर बोलताना हुतात्मा स्मारकांचे जतन, त्याबद्दलचा अभिमान आणि समाजातील सहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच हा दिवस अधिक उत्साहाने, मोठ्या प्रमाणावर आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, मराठी अस्मितेच्या जतनासाठी आणि कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा केली. या उपक्रमामुळे शहरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित साधून समाजात एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश पोहोचला.

COMMENTS