जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

Homeसंपादकीय

जी 23 ला आनंदाच्या उकळ्या

वारंवार होणार्‍या पराभवातून काँग्रेसजण धडा शिकायला तयार नाहीत. पक्षश्रेष्ठीचे दरबारी राजकारण संपायला तयार नाही.

अन्यथा, माणसांची यंत्रे बनतील ! 
नोटबंदीच्या याचिका निकालात ! 
आचारसंहिता आणि आयोग ! 

वारंवार होणार्‍या पराभवातून काँग्रेसजण धडा शिकायला तयार नाहीत. पक्षश्रेष्ठीचे दरबारी राजकारण संपायला तयार नाही. जनमाणसांत स्थान असलेल्यांना डावलायचे आणि खूशमस्कर्‍यांना जवळ करायचे, ही वृत्ती संपत नाही. स्वतःला मूल होत नसले, की दुसर्‍याच्या मुलाचे बारसे साजरे करण्यात धन्यता मानणारा एक वर्ग असतो. काँग्रेसची वृत्तीही याच वर्गासारखी झाली आहे. कुठेही यश मिळत नाही. त्यामुळे भाजप पराभूत होण्यातच आनंद साजरा करण्याची वेळ काँग्रेसजणांवर आली आहे. 

    काँग्रेसच्या संघटनात्मक बाबीेंवर आणि पक्षाध्यक्ष नियुक्तीसाठी आवाज उठविणार्‍यांना दूर करण्याचे, त्यांना प्रचारातही सहभागी करून न घेण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली, तरीही काँग्रेसला शहाणपण आले नाही. आताच्या पराभवाशी तर जी 23 गटाचा काहीही संबंध नाही. त्याचे कारण त्यांना दूर ठेवण्यात आले होते. व्यूहनीती करण्यातही राहुल गांधी व त्यांच्या समर्थकांचा सहभाग होता. त्यामुळे पराभवाची जबाबदारीही त्यांचीच आहे. काँग्रेसमध्ये यशाला अनेक वाटेकरी असतात; परंतु अपयशाचे धनी व्हायला कुणीही तयार नसते. आसाम आणि केरळमध्ये सत्ता मिळण्याची अपेक्षा असताना चुकीच्या धोरणामुळे सत्ता तर मिळाली नाहीच; उलट आहे त्या जागा कमी झाल्या. तमिळनाडूत मित्रपक्षाबरोबर सत्तेत सहभागी होता आले, एवढेच काय ते समाधान. पुद्दुचेरी हातची गेली. पश्‍चिम बंगालमध्ये मागच्या वेळी काँग्रेसचे 64 आमदार होते. विरोधी पक्षनेताही काँग्रेसचा होता. आता मात्र तिथे काँग्रेस नामशेष झाल्यासारखी स्थिती आहे. अशा परिस्थितीत चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या या पराभवामुळे पुन्हा एकदा पक्षात असंतोष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. संघटनेची सद्यस्थिती आणि जमिनीवरचे राजकीय वास्तव लक्षात आल्याने नेतृत्त्वाचा कमकुवतपणा ही पुढे आला आहे. असमाधानकारक काम हे असंतोषाचे एक मोठे कारण आहे. पश्‍चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांचे असंतुष्ट 23 नेत्यांनी उघडउघड कौतुक केले आहे. दीदींच्या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले असले, तरी जी  23 गटातील अन्य नेत्यांनी केलेल्या कौतुकातच वेगळेपण आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठीच्या जवळ असलेल्या कमलनाथ यांच्यासारख्या नेत्याने ममता दीदींचे कौतुक केल्याने भुवया उंचावल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठीही नाराज आहेत. काँग्रेसचे नेते पक्षाला दिशा देण्यात आणि संघटना वाढीकडे फारसे लक्ष देत नाहीत. कोरोना हाताळणीत सरकारला अपयश येत आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी टीका करीत असताना अन्य कोणीही त्याविरोधात बोलत नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आभासी पद्धतीने खासदारांची कोरोनाबाबत बैठक घेतली; परंतु अशा बैठकीतून काहीच साध्य होत नसते, असा सूर जी 23 गटाने लावला आहे. नेतृत्वाने डोेळ्यावरची पट्टी काढली नाही, तर पक्षाचे अधपतन असेच सुरू राहील, असा इशारा हा गट देतो. केरळ आणि आसामचा पराभव आणि बंगालमधील शून्यावर आलेली आमदारांची संख्या ही परिस्थिती असाधारण  अशीच आहे; परंतु एवढ्या मानहानीकारक पराभवानंतरही पक्षाला त्याचे आत्मचिंतन करावे असे वाटले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जोडी केंद्राच्या संपूर्ण सामर्थ्याला ममता एकटेच उत्तर देत होत्या. एकटेच लढत होत्या.  काँग्रेसने आयएसएफशी युती करण्याची पहिली चूक केली. एकदिवसीय रॅलीतही राहुल यांंनी थेट ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला. बंगाल काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भाजपच्या सोबत दीदी यांच्या शपथेवर बहिष्कार टाकला. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या जी 23 गटाने आता राहुल, अधीर रंजन यांच्याविरोधात तोफ डागली आहे.

ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी देशातील विरोधी पक्षातील सर्वांत ताकदवान नेता म्हणून उदयास आल्या आहेत, यात काही शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सप नेते अखिलेश यादव, टीआरएस प्रमुख के चंद्रशेखर राव आणि इतर अनेक नेते ममतांसोबत आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि बसपप्रमुख मायावती यादेखील त्यांच्यासोबत येऊ शकतात. इतकेच नव्हे, तर परिस्थिती अशी निर्माण होत आहे, की ममता यांच्याशी चांगले वैयक्तिक संबंध असलेले बीजेडी प्रमुख, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनाही दीदीकडे येण्याचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व सध्याचे राजकीय वास्तव स्वीकारणार आहे, की नाही असा प्रश्‍न असंतुष्ट नेते विचारीत आहेत. संघटना व शैलीतील बदलांच्या सूचना अंमलात आणण्यास सुरुवात करा. अन्यथा, वेळ टळून गेलेली असेल, असा इशारा हा गट देतो. के. सुधाकरन आणि मुरलीधरन यांच्यासह आसाम आणि केरळमधील बरेच नेते पक्षाच्या सद्यस्थितीबद्दल मौन सोडू शकतात. भाजपला पराभूत करताना जी -2 गटातील एक प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी ममतांना पूर्वेकडील शेरनी म्हटले तर आनंद शर्मा म्हणाले, की दीदी यांनी भाजपचा राजकीय बुलडोझर निष्प्रभ ठरविला आहे. सर्वसमावेशक लोकशाहीवर विश्‍वास ठेवणार्‍यांसमोर आशेचा नवा किरण दाखविला आहे. मनीष तिवारी यांनी ममतांना झाशीची राणी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांनीही दीदी यांचे कौतुक करण्यास कोणतीही कसर सोडली नाही. 

COMMENTS