कर्जत : तालुक्यातील जलालपूर येथील एका शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या कथित त्रासाला कंटाळून थेट उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे धाव घेत गंभीर आरोप

कर्जत : तालुक्यातील जलालपूर येथील एका शेतकऱ्याने खासगी सावकारांच्या कथित त्रासाला कंटाळून थेट उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे धाव घेत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आई-वडिलांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच गोठ्यातील म्हैस जबरदस्तीने घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अरुण छगु काळे यांनी कर्जत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, शेती सुधारणा व आई-वडिलांच्या औषधोपचारासाठी त्यांनी काही खासगी सावकारांकडून मोठ्या व्याजदराने पैसे घेतले होते. मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करूनही संबंधितांकडून पुन्हा पैशांची मागणी होत होती. विरोध केल्यानंतर दमदाटी, शिवीगाळ व सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनानुसार, संबंधित सावकारांविरोधात यापूर्वीही पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्या होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडेही या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला असला तरी मुख्य आरोपींवर कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्य आरोपी यांनी काळे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरी जाऊन आई-वडिलांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत गोठ्यात बांधलेली म्हैस जबरदस्तीने घेऊन गेल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “व्याजाच्या पैशात म्हैस घेऊन जात आहे, जे करायचे ते करा,” अशी धमकी दिल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून केवळ एनसीआर दाखल करण्यात आली, मात्र गंभीर स्वरूपाचा एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कुटुंब भयभीत झाले असून, खासगी सावकारांकडून जीवितास धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS