कोपरगाव : लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुणतांबा परिसरासह महाराष्ट्रात शेकडो मंदिरे, विहि

कोपरगाव : लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुणतांबा परिसरासह महाराष्ट्रात शेकडो मंदिरे, विहिरी, बारवा आणि गोदावरी नदीवरील घाटांची उभारणी केली. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुणतांबा गावात त्यांच्या स्मारकाची उभारणी होत असल्याने गावाच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुणतांबा येथे लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन रविवारी (दि. ३१) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.
काळे म्हणाले, ‘‘अध्यात्म, संस्कृती, संघर्ष आणि इतिहास यांचा संगम पुणतांब्याच्या भूमीत पाहायला मिळतो. अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात या गावातून झाली असून राज्यव्यापी शेतकरी आंदोलन हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी उभारलेल्या मंदिरांचा आणि गोदावरी नदीवरील घाटांचा वारसा जतन करण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.’’
या प्रस्तावामध्ये अहिल्याघाटावरील २६ दगडी पायऱ्या, गोलाकार बुरूज, प्राचीन महादेव मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर तसेच संत चांगदेव महाराज समाधी परिसराचे जतन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भाविक, अभ्यासक आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचाही यात समावेश आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असल्याचे काळे यांनी सांगितले.
नदी संवर्धन योजनेअंतर्गत ११ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला असून हे दोन्ही प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घाट संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री विखे
मागील महिन्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा यशस्वी ठरली. त्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणतांबा येथील अहिल्यादेवींनी बांधलेल्या ऐतिहासिक घाटाच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून अहिल्यादेवींचा इतिहास जतन करण्याचे कार्य सुरू असल्याचा आनंद असल्याचे सांगून या घाटाच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

COMMENTS