कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून आषाढ सरींचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून आषाढ सरींचा जोर कायम असून मुसळधार पावसामुळे विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जवळपास ९० हजार क्युसेक्स पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले देखील दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.धरण समुहात जोरदार पाऊस होत असतांना कोपरगाव मतदार संघातही गेल्या दोन दिवसांत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळले असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.धरण समुहात होत असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे गंगापूर, कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव, दारणा, गौतमी गोदावरी, वालदेवी, भाम आदी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून जवळपास ९० हजार क्युसेक्स पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरीकांनी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात अतिसाहस करू नये. नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करू नये. विशेषतः नदी, ओढे व नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्यावी.नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रशासनाशी तसेच आपल्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आ. काळे यांनी नागरिकांना केले आहे.

COMMENTS