संगमनेर : राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. अशा काळात आपल्या कारखान्याने कायम चां

संगमनेर : राज्यामध्ये अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. सर्वत्र जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. अशा काळात आपल्या कारखान्याने कायम चांगला भाव दिला आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवडी बरोबर एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. एकरी उत्पादन वाढीमध्ये हुमणी अळीसारखे अनेक अडचणी आहेत. हुमणी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर प्रभावी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून विषमुक्त शेती गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भारतीय कृषी संशोधन परिषद व ऊस संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हुमणी आळी नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर याबाबतचे एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लखनऊ येथील भारतीय उत्सव संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ज्ञानेश्वर बोरसे, शास्त्रज्ञ डॉ. योगेश थोरात, चेअरमन पांडुरंग पा.घुले, संचालक रामनाथ कुटे, विजय राहणे, विनोद हासे, विलास शिंदे यांच्यासह विविध अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती मधील शेतकऱ्यांना कॉम्बो ट्रॅपच्या किटचे वितरण करण्यात आले. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन्ही संस्थांच्या संयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.योगेश थोरात म्हणाले की, हुमणी अळीचा प्रादुर्भाव हा ऊस,नारळ, डाळिंब या पिकांवरही होत आहे. मुरबाड जमीन, शेतीलगत बोर,निंब,बाभळ अशी झाडे असणे यामुळे ही अळी वाढते. उन्हाळ्यामध्ये या अळीचे भुंगेरे बाहेर येतात. कॉम्बो ट्रॅप मुळे या भुंगेऱ्यांना रात्री एकत्र गोळा करता येणार आहे. जमिनीची नांगरट दिवसा केली तर अनेक पक्षी येऊन जमिनीतील कीटक खातात. मात्र सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीची रात्रीची नांगरट करतात. त्यामुळे पक्षी रात्री कीटक खाण्यासाठी येत नाहीत. आणि त्यातून हे हुमणी अळीचे कीटक वाढत जातात. कॉम्बो ट्रॅपच्या वापरा बरोबरच अधिक हुमणी अळी झाल्यास जैविक कीडनाशकांचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर बोरसे यांनी तर व्हा.चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

COMMENTS