Homeताज्या बातम्या

विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी कराभूकंपग्रस्तांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्या – आ.आनंदराव  बोंढारकर

नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आ

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जमाफी व पीक विम्याच्या प्रश्नांवर कृषी मंत्र्यांना जाब-नुमान चाऊसशेतकर्‍यांच्या हक्कांसाठी मौलाना आझाद युवा मंचचे कृषी मंत्र्यांना निवेदन



नांदेड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची राज्य शासनाने तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून बाधित नागरिकांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी विधानभवनातील पावसाळी अधिवेशनात केली.
आ. बोंढारकर यांनी सभागृहात नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, भूकंपामुळे अनेक गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून काही ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही रस्त्यांवरही तडे गेल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्व प्रभावित भागांचे सर्वेक्षण करून वास्तविक नुकसानीची नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी विष्णुपुरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील पूल दुर्घटनेचा मुद्दाही सभागृहात उपस्थित केला. ही घटना अत्यंत गंभीर असून या दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी. संबंधित अधिकारी, कंत्राटदार किंवा दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. भूकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आपत्कालीन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. ज्या कुटुंबांचे घरे, मालमत्ता किंवा शेतीचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी. तसेच नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे विलंब न लावता पूर्ण करून शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशीही त्यांनी मागणी केली. याशिवाय भविष्यात अशा नैसर्गिक आपत्ती किंवा पायाभूत सुविधांशी संबंधित दुर्घटना टाळण्यासाठी पुले, रस्ते आणि इतर महत्त्वाच्या बांधकामांचे तांत्रिक परीक्षण नियमितपणे करण्यात यावे. निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही आमदार बोंढारकर यांनी अधोरेखित केले. नांदेड जिल्ह्यातील भूकंप आणि विष्णुपुरी पूल दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेता राज्य शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रभावित नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन मदतकार्य युद्धपातळीवर राबवावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
मुख्य मागण्या :
* भूकंपग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करावेत.
* बाधित नागरिकांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी.
* विष्णुपुरी पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी.
* दोषींवर कठोर कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी.
* नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन उपाययोजना राबवाव्यात.
* भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुले व रस्त्यांचे तांत्रिक परीक्षण नियमित करावे.

COMMENTS