नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच वाडी (बु.) येथील

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच वाडी (बु.) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम येत्या 15 मेपूर्वी पूर्ण करून ते जनतेच्या सेवेत दाखल करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.
नांदेड उत्तर मतदारसंघातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत संबंधित विभागांच्या अधिकार्यांना वेळेत काम पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीला अधीक्षक अभियंता एस. डी. धोत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके, कार्यकारी अभियंता आर. एल. गलधर, सहाय्यक अभियंता संतोष नाईक, शाखा अभियंता मयूर कांबळे, कनिष्ठ अभियंता मनोज चौधरी, कार्यकारी अभियंता अ. वि. जाधव, उपअभियंता काकडे, कनिष्ठ अभियंता कवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वाडी (बु.) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून उर्वरित सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करून रुग्णालय जनतेसाठी खुले करावे, असे निर्देश देण्यात आले. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय तरोडा नाका ते मालेगाव रोड या मार्गावरील उर्वरित काम एका महिन्यात पूर्ण करावे, उत्तर बाह्यरस्ता आणि पश्चिम बाह्यवळण रस्त्यांची रखडलेली कामेही तत्काळ मार्गी लावावीत, असे आदेश देण्यात आले. महाराणा प्रताप चौक ते बाफना मार्गावरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. नांदेड-लिंबगाव-पूर्णा रोड तसेच नांदेड-निळा-आसेगाव-वसमत हे एडीबी अंतर्गत पूर्ण झालेले महत्त्वाचे रस्ते लवकरात लवकर लोकार्पणासाठी तयार ठेवावेत, असेही आमदार कल्याणकर यांनी सांगितले. तळणी-मरळक रस्त्याचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला नोटीस देऊन जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग, पांदण रस्ते, शिवरस्ते यांचे प्रस्ताव तातडीने मागवून विकासकामांना चालना द्यावी, असे सांगताना आ.बालाजीराव कल्याणकर यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रखडलेली कामे सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही दिला. या बैठकीमुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील विकासकामांना नव्याने गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS