आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि.21 जून रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने योगाचा संदेश घराघरात पोहोचवावा यासाठी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
योग दिनाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी देवकते, क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, कालिदास होसूरकर, सतीश राठोड आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरही मोठ्या प्रमाणावर योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रशासनासोबत पतंजली योगपीठ, योगा असोसिएशन, विविध योग संघटना तसेच सामाजिक संस्था सक्रिय सहभाग घेणार आहेत. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, योग साधक, विद्यार्थी, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. भारताची हजारो वर्षांची योग परंपरा आज जगभर पोहोचली असून शारीरिक व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी योग महत्त्वपूर्ण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी 6.30 ते 8 वाजेदरम्यान सामूहिक योग प्रात्यक्षिके, जनजागृती उपक्रम आणि योगाचे महत्त्व पटवून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावरील कार्यक्रमांच्या नियोजनासाठी तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गटविकास अधिकारी सहनोडल अधिकारी तर गटशिक्षणाधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील गावांमध्ये तसेच शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमध्येही योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व स्तरांतील महिला, पुरुष, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी योग दिनात सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

COMMENTS