भीती नको, सावधगिरी बाळगा

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भीती नको, सावधगिरी बाळगा

चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरातील 50 देशात पसरला आहे. भारतात देखील कर्नाटकात अगोदर दोन आणि त्यानं

अमली पदार्थ आणि महाराष्ट्र
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
समानतेच्या दिशेने…

चीनमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर आता ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरातील 50 देशात पसरला आहे. भारतात देखील कर्नाटकात अगोदर दोन आणि त्यानंतर विविध राज्यात सापडलेल्या रुग्णानंतर या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 21 वर पोहचली आहे. राजस्थानात 9 तर महाराष्ट्रात ही संख्या 8 वर पोहचली आहे. ओमायक्रॉनची दहशत मोठी असली, तरी त्याच्या भीतीचा बागुलबूवा न बाळगता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण मोठया प्रमाणात सापडले असले, तरी अद्याप या रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर या रुग्णांनी या व्हेरियंटवर मात केली आहे. मात्र हा व्हेरियंट वेगाने पसरवू शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे पुरेशी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याबरोबर बुस्टर डोस देण्यासंदर्भात भारत सरकारला पावले उचलावी लागणार आहेत. कोरोनाची ज्यावेळेस तोंडओळख कुणालाही नव्हती, त्यावेळेस अनेक देशात हाहाकार उडाला होता. मात्र कोरोनाची सगळयांनाच ओळख झाली असून, पुरेशी खबरदारी घेण्यात येत आहे. शिवाय आरोग्य यंत्रणा देखील याविषयी पुरेशा जागरूक असल्यामुळे यात दररोज नव-नवीन संशोधन सुरू आहे. दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, नव्या व्हेरियंटची लक्षणे डेल्टा व्हेरियंट सारखी धोकादायक नाहीत. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे अद्याप मृत्यू अथवा कोणीही गंभीर आजारी झाल्याचे आढळून आलेले नाही. यावरुन नवा व्हेरियंटची समस्या गंभीर स्वरुपाची नसल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या संकटात सर्वच देशातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. व्यापार्‍यांचे, सर्वसामान्यांचे मोठ नुकसान झाले आहे. यातून सर्वजण सावरत आहे. त्यातच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ उडाली असली तरी घाबरून न जाता, याचा धैर्यतेने आपल्याला सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः महानगरीय शहरांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण या शहरात दक्षिण आफ्रिकेसह विविध देशातून येणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत हलगर्जीपणा आपल्याला परवडणारा नाही. जागतिक आरोग्य केंद्राचे युरोपमधील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी डॉ कॅथरीन स्मॉलवूड यांनी म्हटले आहे, अशा प्रकारच्या उपायांबद्दल आम्ही शिफारसी केलेल्या नाहीत. डब्ल्यूएचओचे आणखी एक तज्ज्ञ आणि आफ्रिकेतील प्रादेशिक संचालक डॉ. मॅत्शिदिसो मोटी यांनी, देशांनी विमान प्रवासांवर निर्बंध घालू नयेत अशी विनंती केली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की अशा प्रकारांच्या मर्यादांमुळे नवा व्हेरियंट फैलावण्यास मदत होऊ शकते, तसेच याचा अर्थव्यवस्था आणि लोकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊ शकतो. कोविड महामारीच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक संसर्गजन्य ठरली. या लाटेचे परिणाम अधिक भीषण होते व त्यामुळे केंद्रीकरणाला मोठा धक्का बसला. या लाटेमुळे घेतलेले अनेक निर्णय, आखलेल्या योजना आणि राबवण्यात आलेली धोरणे यांच्यातील त्रुटी लोकांसमोर आल्या. यात देशांच्या आरोग्य व्यवस्थेतील उणिवा, विषाणूविरुद्धच्या युद्धात केंद्राने मिळवलेल्या यशाचा आत्मघातकी विजयोत्सव, दुसर्या लाटेला थोपवून ठेवण्यास आलेली असमर्थता व तयारीकडे झालेले दुर्लक्ष आणि एनडीएमसारख्या आधी राबवण्यात आलेल्या कायद्यापासून दूर जाण्याचा केंद्राचा विचार यांचा समावेश आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण लसीकरण मोठया प्रमाणात झालेले आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यामुळे, कोरोना रुग्णांची संख्या भारतात सध्या कमी आहे. मात्र ओमायक्रॉनचा व्हेरियंट दोन्ही डोस घेतलेल्यामध्ये देखील जाणवू लागल्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. शिवाय ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहे की, निगेटिव्ह हे समजण्यासाठी जीनोम स्किवेन्सची टेस्ट करावी लागतो. ज्याचा रिपोर्ट येण्यासाठी कधी 72 तर कधी 96 तास लागत आहे. त्यामुळे याचा रिपोर्ट लवकर उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या जिल्ह्यात अद्यावत प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, शिवाय पुरेशी खबरदारी बाळगणे गरजेेचे आहे.

COMMENTS