Homeताज्या बातम्या

पदवीचा उपयोग समाजासाठी करा: मा. नवनाथराव थोटे; माऊली महिला कला महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

बीड: माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे २९ जुलै २०२६ रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रम

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा २६ वा दिवस
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा खाजगी बाजार तेजीत; मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ़ यांचा गंभीर आरोप

बीड: माऊली विद्यापीठ संचलित महिला कला महाविद्यालय, बीड येथे २९ जुलै २०२६ रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माऊली विद्यापीठ, केजचे कोषाध्यक्ष मा. नवनाथराव थोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीडचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी, समुपदेशक माचपल्ले तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार शोभायात्रेने झाली, ज्यामध्ये मान्यवर, पदवीधारक विद्यार्थिनी व प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर यांनी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याची पार्श्वभूमी स्पष्ट करत विद्यार्थिनींनी पदवीचा उपयोग केवळ स्वतःच्या भविष्यासाठी न करता समाजाच्या विकासासाठीही करावा, असे आवाहन केले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पदवीधारक विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनी लोणकर वैष्णवी व ज्योती धांदल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आजीवन अध्ययन विस्तार विभागामार्फत घेण्यात आलेल्या अंगणवाडी-बालवाडी व ग्रंथालय व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील सहभागी विद्यार्थिनींनाही प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे सुहास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना, “पदवीचा उपयोग विधायक कार्यासाठी करा. जीवनात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, इच्छाशक्ती आणि जिद्द आवश्यक आहे,” असा सल्ला दिला. समुपदेशक माचपल्ले यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा उल्लेख करत वेळेचा सदुपयोग करून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने मेहनत करण्याचा संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात मा. नवनाथराव थोटे म्हणाले, “पदवीचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करा. आयुष्यात पुढे जायचे असेल तर सर्वप्रथम पालकांचा विश्वास संपादन करा. आजच्या युवा पिढीने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे आणि आई-वडिलांना अभिमान वाटेल असे कार्य केले पाहिजे.”

कार्यक्रमात पाहुण्यांना प्राचार्या डॉ. संध्या आयस्कर यांच्या हस्ते ग्रंथ भेट देण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुलकर्णी व डॉ. राम ताटे यांनी केले, तर आभार डॉ. लक्ष्मण तोंडाकुर यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, पदवीधारक विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS