Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय सामना कोण जिंकणार ?

राज्यात सत्तांतर नाटयानंतर अनेक गोष्टीमध्ये रंगत आणि संभ्रम दोन्ही वाढतांना दिसून येत आहे. सत्तांतरानंतर भाजपने धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्य

लोकसभा सचिवालयाला साक्षात्कार  
आजची महिला आणि सक्षमीकरण
शेतकरी आंदोलनाचे 300 दिवस

राज्यात सत्तांतर नाटयानंतर अनेक गोष्टीमध्ये रंगत आणि संभ्रम दोन्ही वाढतांना दिसून येत आहे. सत्तांतरानंतर भाजपने धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष येथेच थांबेल असे वाटत असतांनाच, शिवसेना कुणाची हा संघर्ष पुढे आले. शिवसेना आमची असून, धनुष्यबाण चिन्ह आमच्या गटाला मिळाला पाहिजे, हा संघर्ष सुुरु झाला. हा संघर्ष संपत नाही तोच, नव्या निवडणूक चिन्हाचा. तो संपत नाही, तो या निवडणुकीतील ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. कारण त्या महापालिकेमध्ये शासकीय पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र महापालिकेने हा राजीनामा त्वरित न स्वीकारल्यामुळे लटके यांना न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. त्यानंतर न्यायालयाने राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश दिल्यानंतर लटके या ठाकरे गटाकडून लढणार आहेत. राजकीय संघर्षाची आणि धक्क्यांची ही सुरुवात असून, आगामी काळात कुणाला किती धक्क बसतात, हे पहावे लागणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगेल असे वाटत असतांनाच, भाजपने आपला उमेदवार या निवडणुकीत उभा केला आहे. त्यामुळे हा सामना थेट ठाकरे गट विरुद्ध भाजप असा थेट रंगणार आहे. या निवडणुकीत जो उमेदवार जिंकेल, त्याचीच पुढे सिद्धी असेल, हेच या निकालातून स्पष्ट होणार आहे. जो गट जिंकेल त्याच गटाला मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यात येईल. कारण ही पोटनिवडणूक मुंबई महापालिकेची रंगीत तालीम समजायला काही हरकत नाही. एकीकडे ठाकरे गटाला, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाकप या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे आता भाजप एकटा राहिला नसून, त्यांच्यासोबत 40 शिंदे गटाचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार असे एकूण 50 आमदारांचा गट आहे. शिवाय शिंदे गटाची मुंबईत मोठी ताकद असल्यामुळे शिंदे गट आपली पूर्ण ताकद भाजपमागे उभी करणार यात शंकाच नाही. त्यामुळे अंधरी पोटनिवडणुक मोठी चुरशीची होईल, यात शंकाच नाही. दोन्ही गट सध्या आक्रमक झाले असून, या निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष बघायला मिळू शकतो. अंधेरी पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहेत. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरतांना मोठे शक्तीप्रदर्शन केले. यात राणे गटाची मोठी ताकद भाजपच्या मागे उभी राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पराभव कुणाचा होणार आणि विजय कुणाचा होणार याचे भाकित वर्तवणे सध्या तरी शक्य नसले तरी, मात्र ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे, यात वाद नाही. कारण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेच्या जागेसाठी होणारी ही पहिलीच पोटनिवडणूक असल्यामुळे, प्रत्येक पक्षाकडून आघाडी घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय आक्रमक प्रचार हे या निवडणुकीचे वैशिष्टय असणार आहे. अखेर महापालिकेनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके आज अर्ज भरायला गेल्यानंतर त्यांचे सासरे व दिवंगत आमदार रमेश लटके यांचे वडील कोंदिराम लटके यांना अश्रू अनावर झाले होते. ऋतुजा लटके या रमेश लटके यांच्या नावासाठी उभ्या आहेत, पैशांसाठी नाही. त्यांना जनतेनं उभं केलं आहे. आता सर्वकाही जनतेच्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी नोंदवली. त्यामुळे एकीकडे भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे आक्रमक प्रचार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे या चुरशीच्या सामन्यात पुढील भविष्यातील राजकीय गणिते ठरणार आहेत, हे नक्की. जर यात ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला तर, ठाकरे गटाकडे सहानुभूतीची मोठी लाट असल्याचा समज होईल, आणि दुसरीकडे भाजपचा उमेदवार जिंकला तर शिंदे गट आणि भाजपला जनतेने स्वीकारले आहे, असाच एकप्रकारचा संदेश जाईल.

COMMENTS