नांदेड : महिला शासकीय अधिकार्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 व 12 एप्रिल रोजी महाराष्ट्र सदन दिल्ली येथे अत्यंत उत्साहात संपन्न

नांदेड : महिला शासकीय अधिकार्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11 व 12 एप्रिल रोजी महाराष्ट्र सदन दिल्ली येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात नांदेड येथील पोलीस अधिकारी डॉ. ज्योती कदम यांनी सादर केलेल्या ’कर्फ्यू दरम्यानचं शहर’ या एकमेव कवितेबद्दल संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी सुप्रिया देवस्थळी, तसेच संमेलनाध्यक्षा, माजी अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी समारोप सत्रात गौरवोद्गार काढले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उदय सावंत, मराठी भाषा आणि उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राच्या माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. मान्यवरांचे हस्ते सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. विविध विषयावरील परिसंवाद आणि कविसंमेलनाचे विविध सत्र हे संमेलनाचे प्रमुख आकर्षण होते. वित, सहकार, महिला व बालकल्याण, पोलिस, वैद्यकीय , कायदा, मंत्रालय, शिक्षण, जलसंपदा, महसूल, परराष्ट्र मंत्रालय, उच्च आयुक्तालय इ. विविध क्षेत्रातील केंद्र आणि विविध राज्य शासनाच्या महिला अधिकारी या संमेलनात उपस्थित होत्या. वेगवेगळ्या उच्च पदावर कार्यरत असणार्या या साहित्यिक महिला शासकीय अधिकार्यांचे हे पहिले संमेलन सर्वच दृष्टीने ऐतिहासिक ठरले. सरहद्द, पुणे, मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. सर्व महिला अधिकार्यांना यासाठी कार्यालयीन परवानगी देण्यात आली होती. ’दप्तरातून उमललेले काव्यपुष्प’ या सत्रासाठी डॉ . ज्योती कदम यांना निमंत्रित केले होते. त्यांनी ’कर्फ्यु दरम्यानचं शहर’ ही कविता सादर केली. उपस्थित रसिक मान्यवरांनी यावेळी विशेष दाद दिली. समारोपाच्या सत्रात स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी ,सह महालेखा नियंत्रक भारत सरकार यांनी आणि संमेलनाच्या अध्यक्षा लीनाताई मेहेंदळे यांनी आपल्या भाषणात डॉ . ज्योती कदम यांच्या ’कर्फ्यू दरम्यानचं शहर’ या कवितेचा गौरवपूर्ण उल्लेख करुन या कवितेला अनेक मान्यवरांनी दाद दिल्याचे सांगितले. समारोप सत्राला प्रमुख पाहुण्या म्हणून महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर या उपस्थित होत्या. विविध क्षेत्रातील विविध उच्च पदावरील शासकीय महिला अधिकाऱी रसिकांच्या मनात डॉ . ज्योती कदम यांच्या कवितेने विशेष स्थान प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आपल्या पदांचा विसर पडून सगळ्या साहित्यिक महिला अधिकारी या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. या साहित्य संमेलनानिमित्त ’ सौदामिनी ’ ही स्मरणिका काढण्यात आली तिचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती मा. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

COMMENTS