मुंबई : देशाच्या नियोजन, विकास आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर नागरि

मुंबई : देशाच्या नियोजन, विकास आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. जनगणनेच्या नावाखाली समाजमाध्यमांवर काही बनावट अर्ज आणि दुवे मोठ्या प्रमाणावर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या बनावट दुव्यांद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करून तिचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने स्पष्ट केले आहे की, अधिकृत संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही दुव्यावर नागरिकांनी आपली माहिती भरू नये. अशा संशयास्पद दुव्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगामी जनगणना प्रक्रियेसाठी यंदा प्रथमच नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मात्र, या सुविधेचा गैरफायदा घेत बनावट अर्ज प्रसारित केले जात असल्याने सतर्कता आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे आवाहन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आपल्या प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जनतेला इशारा देत जनगणना प्रक्रियेसाठी केवळ शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे. सध्या समाजमाध्यमांवर फिरणारा अर्ज बनावट व अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी अधिसूचित प्रश्नांची माहिती केवळ अधिकृत माध्यमांतूनच सादर करावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच, कोणतीही शंका असल्यास संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

COMMENTS