नांदेड : स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना अनेक जण फसवणुकीचे बळी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यभर

नांदेड : स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न पूर्ण करताना अनेक जण फसवणुकीचे बळी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्यभरात घर, फ्लॅट आणि रो-हाऊस खरेदी करताना ग्राहकांची दिशाभूल होण्याच्या घटना वाढत असल्याने तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
अनेक बिल्डरांकडून आकर्षक जाहिराती, कमी दर, मोफत सुविधा आणि तातडीच्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित केले जाते. मात्र नंतर प्रकल्पाची परवानगी, बांधकामातील त्रुटी, ताबा देण्यास विलंब आणि अतिरिक्त शुल्क अशा समस्या उभ्या राहतात. त्यामुळे ग्राहकांनी कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, मंजूर नकाशा, जमीन एनए परवानगी, अग्निशमन विभागाची परवानगी, पर्यावरण मंजुरी आणि योजना नोंदणी तपासणे हा पहिला टप्पा असावा. योजना नोंदणीकृत प्रकल्पांमध्ये ग्राहकांना कायदेशीर संरक्षण अधिक मिळते. तसेच पूर्णता प्रमाणपत्र (सीसी) आणि रहिवासी प्रमाणपत्र (ओसी)नसताना फ्लॅटचा ताबा घेणे धोकादायक ठरू शकते. अशा इमारतींमध्ये भविष्यात वीज, पाणी, कर आणि इतर सेवा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ग्राहकांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन पार्किंग, सुरक्षा, लिफ्ट, पाणीपुरवठा आणि बांधकामाचा दर्जा तपासावा. करारपत्रातील प्रत्येक अट समजून घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नये. फ्लॅटचे क्षेत्रफळ, एकूण किंमत, अतिरिक्त शुल्क, ताबा तारीख आणि विलंब झाल्यास दंड यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रकल्पाबाबत शंका असल्यास संबंधित महानगरपालिका किंवा प्राधिकरणाकडे माहिती अधिकारातून माहिती मागवता येते. नियमभंग झाल्यास तक्रार नोंदवून कारवाईची मागणी करता येते. घर खरेदी करताना थोडी जागरूकता आणि योग्य सल्ला घेतल्यास आयुष्यभराची बचत सुरक्षित राहू शकते. त्यामुळे ग्राहकांनी केवळ ऑफर्सकडे न पाहता कायदेशीर सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS