Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इनामी जमीन प्रश्न मार्गी; नांदेड उत्तरच्या विकासासाठी आ. कल्याणकर यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे जोरदार पाठपुरावासबस्टेशन, एक्सप्रेस फिडर, उपजिल्हा रुग्णालय व वीजपुरवठा प्रश्नांवर तातडीच्या निर्णयांची मागणी

नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिका

बीड शहरासाठी दिलासादायक निर्णय; शववाहिका दुरुस्त करून लवकरच सेवेत-शेख निजाम
पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत
वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता

नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत सविस्तर बैठक घेत प्रशासनासमोर ठोस मागण्या मांडल्या. असदुल्लाबाद येथील इनामी जमिनीची अनेक प्रकरणे दीर्घकाळापासून प्रलंबित असून ती नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. यावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित प्रकरणांचा लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
नांदेड शहराच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका असलेल्या असदुल्लाबाद परिसरातील इनामी जमिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. मालमत्ता व्यवहार, बांधकाम परवानग्या, कर्जप्रकरणे आणि कायदेशीर नोंदी या सर्व बाबींवर या प्रश्नाचा परिणाम होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आ. कल्याणकर यांनी प्रशासनासमोर हा विषय प्राधान्याने मांडत तातडीने कार्यवाहीची मागणी केली. मगनपुरा भागातील सर्वे क्रमांक 28, 29 आणि 42 वरील इनाम निरस्त करण्याबाबतही बैठकीत सखोल चर्चा झाली. हैदराबाद संस्थान काळात काही इनाम 1954 पूर्वीच निरस्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित जमिनी नियमित करता येऊ शकतात, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच इतर सर्वे क्रमांकांवरील इनाम खालसा करताना शासनाच्या 31 डिसेंबर 2015 च्या राजपत्रातील तरतुदींचे पालन करून प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करावी, असेही त्यांनी सुचविले. जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व प्रकरणांचा लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. बैठकीत नांदेड उत्तरमधील आरोग्य सुविधांचाही प्रश्न आक्रमकपणे मांडण्यात आला. वाडी (बु.) येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असले, तरी आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णालय अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. या ठिकाणी डीपी, ट्रान्सफॉर्मर, लिफ्ट, ऑक्सिजन पाईपलाईन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जलकुंभ आणि अंतर्गत सुविधा तातडीने पूर्ण करून रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल करावे, अशी जोरदार मागणी आ. कल्याणकर यांनी केली. नांदेड उत्तर भागातील हजारो रुग्णांना शहरात धावपळ न करता स्थानिक स्तरावर उपचार मिळावेत, ग्रामीण व शहरी नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी हे रुग्णालय तातडीने सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. वीजपुरवठ्याच्या वारंवार खंडित होणार्‍या समस्येकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नांदेड शहरासह ग्रामीण भागात सतत वीज खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देगलूर नाका आणि पीरबुऱाननगर येथे मंजूर असलेल्या नवीन सबस्टेशनसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय वाडी बुद्रुक परिसरासाठी स्वतंत्र नवीन सबस्टेशन आणि एक्सप्रेस फिडर उभारण्याची मागणीही करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरज लक्षात घेऊन विजेची पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नाळेश्वर आणि राहटी येथेही नवीन सबस्टेशन उभारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे पटरीखालील दोन केबल लाईन दोषग्रस्त झाल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगून महावितरण व रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय साधून त्या केबल्सची तातडीने दुरुस्ती करावी, असेही त्यांनी सुचविले.  या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी, महावितरण अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. विकासकामांबाबत झालेली ही बैठक सकारात्मक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नांदेड उत्तर मतदारसंघातील जमीन, आरोग्य, वीज आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न एकाच वेळी प्रशासनासमोर मांडत त्यावर तातडीच्या निर्णयांची मागणी केल्यामुळे या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात प्रशासनाने गतीने कार्यवाही केल्यास नांदेड उत्तर भागातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS