कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण

कुंडलवाडी : धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवरून दोन गटांत वाद होऊन तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना 8 मे रोजी घडली. या मारहाणीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माष्टी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती. यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीच्या मार्गावरून काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याच वादातून 8 मे रोजी सायंकाळी सुनील पिराजी सोनकांबळे, मीराबाई प्रकाश भालेराव आणि शांताबाई माधवराव सोनकांबळे हे रस्त्याने जात असताना काहींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. यावेळी आमच्या घरासमोर झेंडे का लावले, जयंती का साजरी केली, असा जाब विचारत आरोपींनी संगनमत करून मिरची पूड टाकत विटा व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सुनील पिराजी सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात भक्ती वालाजी कदम, श्रीदेवी हनुमंत कदम, बालाजी लक्ष्मण कदम, श्रीराम बापूराव जाधव, दत्ता हरी कदम, देवदत्त मनोहर कदम, अनुसयाबाई शिवाजी कदम, आनंद शिवाजी जोगदंड, गजानन जाधव, योगेश वळीराम कदम, अवधूत रावसाहेब कदम, शिवाजी सोपान कदम, रावसाहेब रामजी कदम, शंकर मारुती कदम, राधा हनुमंत कदम, सुधीर हनुमंत कदम तसेच इतर काही जणांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या घटनेनंतर काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास कुंडलवाडी पोलीस करत आहेत.

COMMENTS