बीड जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना उत्कृष्ट पोलीस सेवा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेत पद्मपाणि प्रत

बीड जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांना उत्कृष्ट पोलीस सेवा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेत पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार रविवारी (दि. 17 मे 2026) शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विजय जाधवर व त्यांच्या पत्नी अलका विजय जाधवर यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पद्मपाणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप तरकसे, माजी मुख्याध्यापक हौसराव पवार, माजी पोलीस निरीक्षक सुभाष सानप, नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती आरती रंजीत बनसोडे, भागवत तावरे, आत्माराम वाव्हळ तसेच साहित्यिक विठ्ठल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांनी आपल्या 36 वर्षांच्या सेवाकाळातील अनुभव मांडले. नोकरी सुरू केल्यापासून आई-वडील व गुरुंकडून मिळालेल्या संस्कारांच्या बळावर देव, धर्म, कर्म आणि नशीब यांवर विश्वास ठेवत कर्तव्य बजावत आलो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी 1999 मधील एक धाडसी कारवाई आठवली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पाठक यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत असताना नांदेड जिल्ह्यातील मंगरुळ घाटात ट्रक लुटीची घटना घडली होती. बिनतारी संदेश मिळताच विजय जाधवर व सहकारी चालक निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे यांनी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तातडीने कारवाई करत तीन पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त केली तसेच दोन आरोपींना अटक करून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या धाडसी कामगिरीबद्दल तत्कालीन पालकमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र व रोख 2500 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले होते. याबाबत आठवण सांगताना विजय जाधवर म्हणाले, त्या काळात पोलीस कर्मचार्यांचा पगार अवघा 10 हजार रुपये होता. मात्र धाडसी कामगिरीबद्दल मिळालेल्या 2500 रुपयांच्या बक्षिसाची किंमत माझ्यासाठी आजही अमूल्य आहे. त्या रकमेची तुलना आज कोट्यवधी रुपयांशीही होऊ शकत नाही.

COMMENTS