नांदेड : नांदेड शहरात अवैध मटका व्यवसाय पुन्हा एकदा फोफावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शहर पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे का, असा थेट
नांदेड : नांदेड शहरात अवैध मटका व्यवसाय पुन्हा एकदा फोफावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शहर पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे का, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण शहराच्या मध्यवर्ती भागात, सर्वांच्या नजरेसमोर आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनधास्तपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक पोलिसांनी नव्हे, तर थेट पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई करावी लागली. या घटनेमुळे नांदेड शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कलामंदिर परिसरात बसस्थानकाच्या बाजूला एका शेडमध्ये दीर्घकाळापासून मटका अड्डा सुरू होता. या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असल्याची चर्चा होती. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले की जाणूनबुजून डोळेझाक केली, याबाबत संताप व्यक्त होत आहे. अखेर नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायविरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (28 एप्रिल) अचानक छापा टाकण्यात आला. धाड टाकताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पथकाने अड्ड्यावर सुरू असलेला मटका व्यवहार रंगेहाथ पकडला. या कारवाईत नऊ जण प्रत्यक्ष जुगार खेळताना आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत आणखी आरोपींची नावे समोर आली असून, एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात पोलिसांनी 37 हजार 600 रुपये रोख रक्कम, 26 हजार 500 रुपयांचे सात मोबाईल फोन, तसेच 28 हजार रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 92 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या जप्तीमुळे अड्ड्यावर किती मोठ्या प्रमाणावर व्यवहार चालत होते, याचा अंदाज येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता, या मटका अड्ड्याचे सूत्रधार म्हणून काही नावांचा खुलासा झाला. त्यानुसार कमल यादव (दिलीपसिंह कॉलनी), अन्वर शेख (समीराबाग, खडकपुरा), माधव भुसेवाड (शिवशक्तीनगर, मिल रोड) आणि राजेश शर्मा (कलामंदिर परिसर) हे मटका व्यवसायाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या सर्वांविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, शहरातील संवेदनशील आणि वर्दळीच्या भागात एवढा मोठा अवैध व्यवसाय सुरू असताना स्थानिक पोलीस ठाण्याला त्याचा पत्ताच नव्हता का? की माहिती असूनही कारवाई टाळली जात होती? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांना रोज दिसणारा अड्डा जर पोलिसांना दिसत नसेल, तर ती प्रशासनाची गंभीर अपयशाची कबुलीच मानावी लागेल. शहरात अनेक भागांत मटका, क्लब, पत्ते, सट्टा आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक प्रभावशाली मंडळींच्या आश्रयामुळे हे व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कारवाई केवळ छोट्या अड्ड्यांपुरती मर्यादित न राहता, या संपूर्ण जाळ्याचा शोध घेऊन मोठ्या मास्यांवर हातोडा पडणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्यासोबत जमादार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या धाडसी कारवाईचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक करून संबंधित अधिकारी व कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, अवैध व्यवसायांना लगाम घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात मटका, सट्टा, दारू, जुगार किंवा इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्यास 9150100100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांचा प्रश्न मात्र सरळ आहे – जर माहिती दिल्यानंतरच कारवाई होत असेल, तर स्थानिक गुप्तचर यंत्रणा नेमकी करते काय? नांदेड शहरात फोफावलेल्या अवैध धंद्यांवर आता सातत्याने मोहीम उभी राहणार का, की ही कारवाई फक्त एकदिवसीय दिखावा ठरणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS