नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने देशभरात चर्चेचे नवे केंद्र निर्माण केले आहे. पारंपरिक घोषणाबाजी, आक्रमक भूमिक

नांदेड: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने देशभरात चर्चेचे नवे केंद्र निर्माण केले आहे. पारंपरिक घोषणाबाजी, आक्रमक भूमिका आणि संघर्षाच्या पद्धतींपेक्षा आजची ‘जेन झी’ (Gen Z) पिढी आंदोलनाला वेगळा आणि अधिक सर्जनशील चेहरा देताना दिसत आहे. हातात मागण्यांचे फलक, पोलिसांना गुलाबाची फुले व चॉकलेट देऊन साधलेला संवाद आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे या आंदोलनाची शैली देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.
आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी पोलिसांना गुलाबाची फुले व चॉकलेट देत, “आम्ही तुमचे कर्तव्य समजतो, तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे करू” असा सौहार्दाचा संदेश दिला. या कृतीतून विरोध असला तरी वैरभाव नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी हातातील पोस्टर्सवर “पूछो… पूछो… आप हमसे पूछो, क्यों नहीं पूछते हो?” असे उपरोधिक व विचारप्रवर्तक संदेश लिहून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या आंदोलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियाचा कल्पक वापर. आंदोलन सुरू असतानाच विद्यार्थी रील्स, व्हिडिओ आणि थेट प्रक्षेपणाद्वारे (Live Stream) आपल्या भूमिका लाखो लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे हे आंदोलन केवळ जंतर-मंतरपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देताना “जेन झी केवळ आंदोलन करत नाही, तर आंदोलनातून आशयघन कंटेंट निर्माण करते” असे मत व्यक्त केले आहे. शांततापूर्ण प्रतिकार, सर्जनशीलता आणि संवाद यांचा मिलाफ असलेल्या या पद्धतीला आता ‘मॉडर्न गांधीगिरी’ असे म्हटले जात आहे.
मात्र, तज्ज्ञांच्या मते आंदोलनाची शैली कितीही नाविन्यपूर्ण असली, तरी त्याचे अंतिम यश सरकार व प्रशासन यांच्यासोबत होणारा सकारात्मक संवाद आणि ठोस निर्णयांवरच अवलंबून असते.
चर्चेचा मुद्दा
लोकशाहीतील आंदोलनाची ही नवी भाषा आहे का? गांधीगिरी, सर्जनशील पोस्टर्स आणि डिजिटल माध्यमांचा हा संगम लोकशाहीला अधिक प्रभावी दिशा देईल का? की मूळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी धोरणात्मक चर्चाच आवश्यक आहे? या प्रश्नांवर आता देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
– ॲड. संजय रुईकर

COMMENTS