बीड : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्यांना वेळ देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी भेट न दिल्याचा

बीड : बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलनकर्त्यांना वेळ देण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी भेट न दिल्याचा आरोप करत, त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज दि. ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी दिली.
डॉ. गणेश ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या छाया गणेश पांचाळ प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून विविध निवेदने व आंदोलने करण्यात आली. मात्र, न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या किष्किंधा पांचाळ (जिल्हाध्यक्ष, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, बीड) यांनी पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर छाया पांचाळ यांना न्याय द्या अशा घोषणा दिल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी आंदोलनकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा तसेच बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच) यांना घोषणाबाजी केली नसतानाही मारहाण केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी तसेच आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्र), जिल्हाधिकारी बीड आणि पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी निवेदन देण्यात आल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले. डॉ. गणेश ढवळे यांनी पुढे म्हटले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१)(ब) नुसार नागरिकांना शांततापूर्ण व विनाशस्त्र एकत्र येऊन आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असल्याचे अनेक निर्णयांत स्पष्ट केले आहे. मात्र, बीडमध्ये शांततापूर्ण आंदोलनांनाही परवानगी नाकारली जात असल्याने त्यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला

COMMENTS