देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत ग्राहकांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना अपमानास्पद वा
देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत ग्राहकांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींनी आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त ग्राहकांनी संबंधित महिला रोखपाल यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास बँक शाखेलाच टाळे ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला असून, काही महिन्यांपूर्वी नियुक्त झालेल्या या महिला रोखपालांकडून खातेदारांशी उद्धट व अपमानास्पद वर्तन केले जात असल्याचा थेट आरोप केला आहे.
देवळाली प्रवरा परिसरातील शेतकरी, महिला बचत गट, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर खाती या शाखेत असल्याने येथे दररोज शेकडो ग्राहकांची ये-जा असते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, अनेकांनी बँकेत जाणेही नकोसे झाले असल्याची भावना व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या महिला कर्मचाऱ्यांविरोधात यापूर्वी तांदुळवाडी (ता. राहुरी) शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असतानाही तक्रारी झाल्या होत्या. तिथे चौकशी झाल्यानंतर त्यांची बदली देवळाली प्रवरा येथे रोखपाल म्हणून करण्यात आली होती; मात्र येथेही त्यांच्याविरोधात तक्रारींचा पाऊस सुरूच आहे.
जाँन संसारे, नानासाहेब कदम, आप्पासाहेब ढुस, सोपान चौधरी यांच्यासह बागायतपीक सोसायटी, देवळाली प्रवरा सोसायटी आणि शहरातील विविध पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांच्याकडे लेखी व दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या आहेत. तब्बल १० ते १५ ग्राहक व संस्थांनी लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने ग्राहकांचा संताप आणखी वाढला आहे.
समज देण्यात येईल : संजय दुधाळ (तालुका विकास अधिकारी)
या संदर्भात राहुरी तालुक्याचे जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी संजय दुधाळ यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी संबंधित रोखपाल महिला कर्मचाऱ्यास समज देऊन ग्राहकांशी सौजन्याने वागण्यास सांगण्यात येईल, असे स्पष्ट केले.
तालुका विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करा : रावसाहेब वर्पे (कार्यकारी संचालक)
“देवळाली प्रवरा जिल्हा बँकेच्या शाखेतील रोखपाल यांची तक्रार करायची असेल तर ती राहुरी तालुका विकास अधिकारी यांच्याकडे करा. अशा किरकोळ तक्रारीत मी लक्ष कसे घालणार? छोट्या घटना तालुक्याच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालीत जा, ते संबंधित कर्मचाऱ्यास समज देतील,” असे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे बँक ग्राहकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

COMMENTS