Homeताज्या बातम्या

परिस्थितीनुसारच अशोकराव चव्हाण यांच्यावर टीका केली;आता बँकेच्या उभारणीसाठी सर्वांनी एकत्र यावे : चिखलीकर

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध राजकीय आणि सहकार क्षेत्राशी स

अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
नांदेड विधान परिषद भाजपाच्या वाट्यालाराजूरकर परिवाराची उमेदवारी जवळपास निश्चित?
अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्हा भाजपमय झालाविधानपरिषद निवडणुकीतील विजयाने भाजपच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब


नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विविध राजकीय आणि सहकार क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर भाष्य करताना, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर भूतकाळात केलेले आरोप त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार असल्याचे स्पष्ट केले. आता मात्र जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती सुधारून तिला लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्तीवर सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्याबद्दल बोलताना चिखलीकर यांनी या यशाचे श्रेय 2004 पासून सातत्याने साथ देणार्‍या मतदार, कार्यकर्ते आणि सहकार्‍यांना दिले. त्यांच्या विश्‍वासामुळेच ही जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले. बिनविरोध निवडीमागे राजकीय तडजोड झाल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे आरोप फेटाळले. अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील तीन जागांवर अद्याप निवडणूक होत असल्याचे नमूद करत, काही ठिकाणी वेळेचा अभाव किंवा कार्यकर्त्यांची समजूत न निघाल्याने निवडणूक अपरिहार्य ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बिनविरोध प्रक्रियेला कोणत्याही राजकीय सौद्याची जोड देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
भूतकाळात अशोकराव चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता, मी कोणालाही घाबरून बोलत नाही. त्या त्या परिस्थितीनुसार भूमिका मांडली होती, असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीत मात्र जिल्हा बँकेच्या पुनर्बांधणीसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमधील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत विचारले असता, येणारा काळच सर्व काही ठरवेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण प्रामाणिकपणे काम केले असून, पुढील राजकीय दिशा पक्ष नेतृत्व ठरवेल, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जप्रकरणी येणार्‍या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रश्‍नांवर जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच जिल्हा बँकेची जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, आतापर्यंत सुमारे 75 टक्के थकबाकीची वसुली झाल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS