अवैध रेती उत्खननाविरोधातील मोठी कारवाई; यंत्रसामग्रीसह 20 ब्रास रेती जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल मुदखेड : नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाविर
अवैध रेती उत्खननाविरोधातील मोठी कारवाई; यंत्रसामग्रीसह 20 ब्रास रेती जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल
मुदखेड : नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. मुदखेड पोलिसांनी गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून जिल्हाभरातून मुदखेड पोलिसांच्या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की, वासरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात कोणतीही वैध परवानगी न घेता यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर रेतीचा उपसा सुरू आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांसह संयुक्त पथक तयार केले आणि घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही जण तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले. मात्र घटनास्थळी असलेली यंत्रसामग्री, रेती आणि उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधने पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत चार लोखंडी हायपर, रेती उपसा करण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि अंदाजे 20 ब्रास रेती असा एकूण 1.01 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरोधात मुदखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गोदावरी नदीपात्रातील अनियंत्रित रेती उत्खननामुळे नदीचे अस्तित्व, भूजल पातळी आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत मुदखेड पोलिसांनी केलेली ही धडक कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाचा धाक अधिक बळकट झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अंगद कदम, कवठेकर, पिल्लेवार, गायकवाड, जावेद, सावंत तसेच होमगार्ड सूर्यवंशी, पांचाळ, रोडगे, कांबळे आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS