अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटोदा शहरातील संगमेश्वर

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगी व्यवस्थापनात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने पाटोदा शहरातील संगमेश्वर मंदिर परिसरात शुक्रवारी (दि. 10) ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पाटोदा पोलीस ठाण्यात देण्यात आले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यभर 9 ते 14 जुलैदरम्यान हे आंदोलन राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटोदा येथे सकाळी 11 वाजता संगमेश्वर मंदिरात सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन, ‘खरा तो एकची धर्म’ तसेच ‘पसायदान’ सादर करत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. या सत्याग्रहात पक्षाचे झेंडे न वापरता काँग्रेसचे दुपट्टे आणि पांढर्या टोप्या परिधान करण्यात आल्या होत्या. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या देणगी व्यवस्थापनात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्याग्रहानंतर पाटोदा पोलीस ठाण्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सहसचिव चंपत राय, ट्रस्टी अनिल मिश्रा आणि कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, ज्येष्ठ शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, माजी सैनिक शहाजी नाईकनवरे, सुनील दादा जाधव, राहुल नागरगोजे, तानाजी जाधव, माणिक जाधव, दिलीप वाघमारे, नामदेव गाडेकर, बाबू देशमुख, शंकर घाडगे, बापू गायकवाड, शरद राऊत, गणेश जाधव, संजय नागरे, शिवाजी जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS