Homeताज्या बातम्या

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला वेग; 7 ते 10 जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरेप्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देत लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर ) - 2026 अभियानाला बीड जिल्ह्यात अधिक गती देण्यात आली आहे. ज

भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान



भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर ) – 2026 अभियानाला बीड जिल्ह्यात अधिक गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 7 ते 10 जुलैदरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचे गणना प्रपत्र अचूकपणे भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यावर प्रशासनाचा भर आहे. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून निवडणूक व महसूल यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः बीड शहरात घरभेटी देत या अभियानाचा शुभारंभ केला होता. त्यानंतर सातत्याने आढावा बैठका, क्षेत्रभेटी आणि प्रत्यक्ष पाहणी करून कामाला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी विशेष आदेश काढून बूथस्तरीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, महसूल सेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश दिले आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष शिबिरे सुरू करण्यात आली असून बूथस्तरीय अधिकारी आणि नियुक्त सहाय्यक कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून गणना प्रपत्रांचे वाटप, भरणे व पडताळणीचे काम करीत आहेत. पावसाळ्याचा विचार करून शिबिरांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दवंडी, ध्वनिक्षेपक, समाजमाध्यमे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात स्वस्त धान्य दुकानदार, ग्राम रोजगार सेवक, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कृषी सहाय्यक आणि इतर कर्मचार्‍यांची बूथस्तरीय अधिकार्‍यांना सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घराघरात पोहोचून माहिती संकलन, प्रपत्र वितरण आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम अधिक प्रभावीपणे सुरू आहे. जिल्ह्यातील 2 हजार 416 मतदान केंद्रांवरील 21 लाख 93 हजार 827 मतदारांपैकी आतापर्यंत 6 लाख 79 हजार 550 गणना प्रपत्रांचे वितरण पूर्ण झाले असून हे प्रमाण 30.98 टक्क्यांवर पोहोचले आहे. यापैकी 1 लाख 47 हजार 530 प्रपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून 1 लाख 46 हजार 929 प्रपत्रांची बूथस्तरीय अधिकार्‍यांकडून पडताळणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय प्रगतीमध्ये अंबाजोगाई तालुका सर्वाधिक आघाडीवर असून तेथे 1 लाख 17 हजार 238 गणना प्रपत्रांचे वितरण करून 50.56 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर वडवणी (45.91 टक्के), धारूर (43.20 टक्के), माजलगाव (37.51 टक्के), गेवराई (36.23 टक्के), केज (32.53 टक्के), शिरूर (31.82 टक्के), पाटोदा (29.96 टक्के), आष्टी (25.71 टक्के), परळी (21.97 टक्के) तर बीड तालुक्यात 67 हजार 200 गणना प्रपत्रांचे वितरण करून 15.39 टक्के प्रगती नोंदविण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रगतीचा दररोज आढावा घेतला जात असून ज्या भागात कामाचा वेग कमी आहे, तेथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. गणना प्रपत्र भरताना मतदारांनी नाव, पत्ता, जन्मतारीख, भ्रमणध्वनी क्रमांक, आधारविषयक तपशील, अद्ययावत छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे अचूकपणे उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा मजबूत पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद होणे अत्यंत आवश्यक असून कोणताही मतदार वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी बूथस्तरीय अधिकार्‍यांना सहकार्य करावे. तसेच अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही नागरिकांनी विशेष शिबिरांना उपस्थित राहून आपले गणना प्रपत्र वेळेत भरून द्यावे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

COMMENTS