महापौरपदी नारायण चौधरी, उपमहापौरपदी तारिक मोमीनमुंबई : भिवंडी महापालिकेच्या राजकारणात शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौरपदी भाजपमधून बंड करू

महापौरपदी नारायण चौधरी, उपमहापौरपदी तारिक मोमीन
मुंबई : भिवंडी महापालिकेच्या राजकारणात शुक्रवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौरपदी भाजपमधून बंड करून बाहेर पडलेले नगरसेवक नारायण चौधरी यांची निवड होताच स्थानिक सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसने कुशल राजकीय डावपेच रचत महत्त्वाचा विजय आपल्या बाजूने खेचून घेतला आहे.
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला भाजपकडून नारायण चौधरी यांचे नाव पुढे आले होते. मात्र ऐनवेळी उमेदवारीत बदल करून स्नेहा पाटील यांना संधी देण्यात आली. या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी उसळली. चौधरी यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आणि त्यांच्या समर्थक आठ नगरसेवकांसह स्वतंत्र भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दुपारी स्व. विलासराव देशमुख सभागृहात झालेल्या मतदानात चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. एकूण 48 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेसच्या 30 नगरसेवकांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 नगरसेवकांनीही चौधरी यांच्या बाजूने मतदान केल्याचे समजते. हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठी एकूण 10 अर्ज दाखल झाले होते. त्यात चौधरी यांचे दोन अर्ज होते. छाननीनंतर सर्व अर्ज वैध ठरले. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. या दरम्यान कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलिस सुरक्षा ताफ्यासह येत असल्याने वेळ वाढवण्याची मागणी झाली; मात्र पिठासीन अधिकार्यांनी प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला. अखेरीस सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने स्नेहा पाटील, नारायण चौधरी आणि शिंदे गटाचे विलास पाटील यांच्यात तिरंगी लढत रंगली. निकालात चौधरी यांना 48 मते, शिंदे गटाच्या विलास पाटील यांना 25 मते, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना केवळ 16 मते मिळाली. या निकालाने भिवंडीत भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काँग्रेसने योग्य वेळी केलेल्या राजकीय हालचालींमुळे सत्ता समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नाट्यमय घडामोडीनंतर राजकीय गणित बदलले
उपमहापौर पदाची निवडणूकही तितकीच रंगतदार ठरली. या पदासाठीही तिरंगी लढत झाली. काँग्रेसचे तारिक मोमीन यांनी 43 मते मिळवत बाजी मारली. शिंदे गटाचे जावेद दळवी यांना 25 मते मिळाली, तर भाजपचे सुहास नकाते यांना 21 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने भिवंडीत काँग्रेसची भूमिका अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले. उपमहापौर निवडणुकीदरम्यान छाननी प्रक्रियेत एक अनपेक्षित वळण आले. कोणार्क विकास आघाडीचे मयुरेश पाटील यांच्या अर्जावर एका नगरसेविकेने सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती, तर त्याच नगरसेविकेने दुसर्या उमेदवाराच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही केल्याचे निदर्शनास आले. नियमानुसार एकाच व्यक्तीला अशा दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये राहता येत नसल्याने मयुरेश पाटील यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे स्पर्धेचे गणित बदलले.

COMMENTS