मुंबई : मुंबई आणि महानगर परिसरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या (CNG) दरात प्रतिकिलो २ रुपय

मुंबई : मुंबई आणि महानगर परिसरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजीच्या (CNG) दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, घरगुती वापरासाठी नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (PNG) दरातही ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ८६ रुपये झाला आहे.
ही दरवाढ शनिवार, ३० मे पासून लागू करण्यात आली असून, तिचा परिणाम लाखो वाहनधारकांसह सर्वसामान्य ग्राहकांवर होणार आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच सीएनजीवर चालणाऱ्या खासगी वाहनांच्या वापराचा खर्च वाढणार असल्याने नागरिकांच्या मासिक अर्थसंकल्पावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. महानगर परिसरातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये यापूर्वी सीएनजीचा दर प्रतिकिलो ८४ रुपये होता, जो नव्या वाढीनंतर ८६ रुपयांवर पोहोचला आहे. याचबरोबर घरगुती नैसर्गिक वायूचा (पीएनजी) दर वाढून प्रति युनिट ५२ रुपये झाला आहे. या निर्णयाचा परिणाम सुमारे ३१ लाखांहून अधिक कुटुंबांवर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इंधन खर्च वाढल्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी पुन्हा भाडेवाढीची मागणी पुढे आणली आहे. वाहनचालकांच्या संघटनांच्या मते, इंधन दरातील वाढ लक्षात घेता प्रवासी भाड्याचा फेरविचार करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे येत्या काळात रिक्षा व टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे सादर केला जाणार आहे.
यापूर्वी १३ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी एप्रिल महिन्यातही प्रतिकिलो १ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या काही आठवड्यांत सीएनजीच्या दरात एकूण ५ रुपयांची वाढ झाली आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ असल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

COMMENTS