मुंबई : राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी कुणाल कुमार यांनी अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठ

मुंबई : राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी कुणाल कुमार यांनी अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या निर्णयाला मान्यता देत अधिकृत आदेशही जारी केले असून ते मार्च अखेरनंतर पदमुक्त होणार आहेत. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामागील कारणांबाबत मात्र अद्याप स्पष्टता नसून विविध स्तरांवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कुणाल कुमार हे 1999 च्या तुकडीतील सनदी अधिकारी असून सध्या ते मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी 2014 ते 2018 या कालावधीत पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यकाळात शहर विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. चोवीस तास पाणीपुरवठा योजना, तंत्रज्ञानाधारित सेवा आणि शहर सुधारणा उपक्रमांमुळे त्यांच्या कामाची विशेष दखल घेतली गेली. प्रशासनात शिस्तप्रिय व ठाम निर्णयक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळल्या आहेत. गडचिरोली, नागपूर, भंडारा, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या ठिकाणी त्यांनी विविध पदांवर काम करताना प्रशासनिक अनुभव संपादन केला. जळगाव, भंडारा तसेच औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून दोन वर्षांचा आणि कोल्हापूर महापालिकेत आयुक्त म्हणून तीन वर्षांचा अनुभव त्यांच्या खात्यात जमा आहे. त्यामुळे शहरी विकास, महसूल प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा त्यांना व्यापक अनुभव लाभला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, अशा अनुभवी आणि प्रभावी अधिकार्याने अचानक सेवेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकारच्या आदेशानुसार, कुणाल कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यात आली असून मार्च अखेरनंतर ते अधिकृतपणे सेवेतून मुक्त होतील. त्यांच्या पुढील वाटचालीबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

COMMENTS