अकोले : पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध दारू व गुटखा विक्रीला मोठा ऊत आला आहे. या बेका

अकोले : पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध दारू व गुटखा विक्रीला मोठा ऊत आला आहे. या बेकायदेशीर व्यवसायांविरोधात आता अकोले तालुक्यातील गावागावांतील नागरिक आक्रमक झाले असून, तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे. ज्या गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरू आहे, तेथील युवक व महिलांना संघटित करून हा धंदा कायमचा बंद पाडण्याचा निर्धार ‘अकोले तालुका दारूबंदी आंदोलनाच्या’ बैठकीत करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या वतीने अकोले पोलीस ठाण्यात जाऊन एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. ज्या गावांमध्ये अवैध दारू गाळली किंवा विकली जाते, त्या गावांतील स्थानिक पोलीस पाटील आणि गस्त घालणारे पोलीस अधिकारी यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
ही दारूबंदी चळवळ अधिक प्रभावी आणि संघटित करण्यासाठी ‘अकोले तालुका दारूबंदी आंदोलनाची’ अधिकृत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या आंदोलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यासोबतच तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन स्थानिक पातळीवर दारूबंदी समित्या आणि उपकार्यकारिणी स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या नवनियुक्त कार्यकारिणीत मच्छिंद्र देशमुख, सुभाष गायकर, प्रदीप हासे, हरिभाऊ फापाळे, संतोष मुतडक, सुनील उगले, रवी मालुंजकर, अविनाश कानवडे, जालिंदर बोडके, अमोल ठुबे, सुनील शेळके, तुकाराम वाकचौरे, अभिमन्यू अस्वले, राजेंद्र कुमकर, अनिल कोळपकर आणि कैलास नवले यांचा समावेश करण्यात आला आहे.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात कार्यकर्त्यांचे पथक प्रत्येक गावात जाऊन अवैध दारूविक्रीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना (SP) सोपवला जाणार आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः अकोले तालुक्यात, विशेषतः राजूर आणि डोंगराळ परिसरात येऊन दारूबंदीच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधावा, अशी मागणीही लावून धरण्यात येणार आहे. या बैठकीला डोंगरगावचे सरपंच दशरथ उगले, म्हाळादेवीचे अनिल मुठे, भाऊसाहेब नाईकवाडी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS