आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्

आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, आनंदगाव (ता. केज, जि. बीड) आणि स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यवाचन स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण स्पर्धा तसेच जागतिक सहकार दिनानिमित्त सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सहकार क्षेत्रातील जाणकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
5 जुलै 2026 रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालयाच्या वाचनकक्षात शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या गटातील काव्यवाचन व उत्स्फूर्त भाषण स्पर्धा पार पडल्या. काव्यवाचन स्पर्धेत यशवंत सौदागर यांनी प्रथम, तर सोहम गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत सोहम गायकवाड यांनी प्रथम, तर आनंद गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड आणि शिवाजी सौदागर यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाणचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड, तसेच ज्ञानेश्वर गायकवाड, शिवाजी सौदागर आणि संभाजी लवटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. दरम्यान, 3 जुलै 2026 रोजी जागतिक सहकार दिनानिमित्त सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या विचारातून सहकाराचे महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, रावसाहेब जाधव, कमलाकर साबळे, जनार्धन गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, एमआयटी पुणेचे गोविंद गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, रविंद्र गायकवाड आणि एस. के. वैरागे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गायकवाड यांनी सहकार ही विकास आणि समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील साखर कारखाने, सुतगिरण्या, पतसंस्था, सहकारी बँका, सेवा सहकारी संस्था, दूध डेअरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट आदी संस्थांमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला, लघुउद्योजक आणि बेरोजगारांना आर्थिक बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विना सहकार नाही उद्धार हे ब्रीदवाक्य आजही तितकेच समर्पक असून सहकार चळवळ समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकासाची संधी पोहोचवत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दोन्ही कार्यक्रमांचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS