Homeताज्या बातम्या

वर्षभर दडपलेली फाईल अखेर उघडली; सुनील मोरे प्रकरणात मुख्याध्यापक पवळे यांच्यावर विभागीय चौकशी

नांदेड: जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, वर्ष

पेपरफुटीविरोधात आज नवे विधेयक मांडणार? दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास, ५० लाखांच्या दंडाची तरतूद
बोर्डाच्या ढिसाळ मूल्यमापनाचा विद्यार्थ्यांना आर्थिक फटका; रिचेकिंग शुल्क परत करण्याची मागणी
हरिश्चंद्र गडावर दरड कोसळली; मालाडचे चार पर्यटक गंभीर जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

नांदेड: जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, वर्षभरापासून धूळ खात पडलेली चौकशीची फाईल अखेर पुन्हा उघडण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत अभिलेखांमध्ये त्रुटी आढळूनही कारवाईपासून दूर राहिलेले तत्कालीन मुख्याध्यापक पवळे यांना अखेर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सुनील मोरे यांनी दोन अपत्यांसह आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. मोरे यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या तक्रारीवर शिक्षण विभागाने वेळेत निर्णय घेतला असता, ही दुर्दैवी घटना टळू शकली असती का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. संबंधित तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रचंड टीका होत आहे.

मोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यापूर्वी गटशिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापक पवळे आणि मोरे या दोघांची चौकशी केली होती. या चौकशीत पवळे यांच्या कार्यकाळातील अभिलेखांमध्ये त्रुटी असल्याचे नमूद करण्यात आले होते. दुसरीकडे, मोरे यांच्या विरोधात कोणतीही गंभीर अनियमितता आढळून आली नव्हती. मात्र, चौकशी अहवालात व्हिडिओ चित्रीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडत त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी केला होता.

प्राथमिक चौकशीत त्रुटी स्पष्ट झाल्यानंतरही पवळे यांच्याविरोधात कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना कोणाचे संरक्षण मिळत होते का, याबाबत जिल्हा परिषद वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जिल्हा परिषदेकडून संबंधित कागदपत्रे आणि माहिती मागविल्यानंतर शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली. त्यानंतर पवळे यांना नोटीस बजावून विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता या चौकशीत जबाबदारी निश्चित होणार का आणि दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवरही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS