Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये रक्तरंजित साखळी; शिवसेना कार्यकर्त्याची हत्या

नांदेड : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग खुनांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे सावट दाटले असून, सोमवारी पहाटे घडलेल्या आण

राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल
जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र
नांदेड तिहेरी हत्याकांड : गँगवारपासून राजकारणापर्यंत थेट कनेक्शनएमआयएम नगरसेवक चौकशीच्या फेर्‍यात, एसपी ऑफिसवर पक्षीय दबाव?

नांदेड : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग खुनांच्या मालिकेने नागरिकांमध्ये भीतीचे सावट दाटले असून, सोमवारी पहाटे घडलेल्या आणखी एका भीषण घटनेने शहर अक्षरशः हादरून गेले आहे. शिवसेना कार्यकर्ते अनिकेत ( सोनू )कल्याणकर यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून, दोन दिवसांत झालेल्या या पाचव्या खुनामुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
ही थरारक घटना श्रीनगर रस्त्यावरील चंदनानी दुकानाजवळील कुमार ड्रेसेससमोर घडली. पहाटेच्या सुमारास परिसरात शांतता असताना अचानक एका चारचाकी वाहनातून सहा ते सात जण खाली उतरले. त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड व इतर धारदार शस्त्रे होती. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी सोनू कल्याणकर यांच्यावर अचानक हल्ला चढवला.हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरतेने त्यांच्यावर वार केले. मानेवर, पाठीवर तसेच शरीराच्या विविध भागांवर सपासप वार करण्यात आले. काही क्षणांतच हा हल्ला इतका भीषण झाला की, सोनू कल्याणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी तातडीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. सकाळच्या वेळी ट्युशनसाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
सोनू कल्याणकर हे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांचे भाचे असल्यामुळे या हत्येला सामाजिक आणि राजकीय संदर्भही जोडले जात आहेत. तीन वर्षांपूर्वी वैयक्तिक वादातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र तेव्हा ते थोडक्यात बचावले होते. यावेळी मात्र हल्लेखोरांनी त्यांना कोणतीही संधी न देता ठार केले. या हत्येमागे गँगवारचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नांदेडमध्ये काही दिवसांपासून विविध गुन्हेगारी टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः ‘रिंधा गँग’शी संबंधित काही संशयितांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. शहरातील विविध ठिकाणी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
गेल्या दोन दिवसांत सलग पाच खून झाल्यामुळे नांदेड शहरातील कायदा-सुव्यवस्था पूर्णतः ढासळल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्यावर उघडपणे होणार्‍या हत्या, टोळ्यांचा वाढता प्रभाव आणि पोलिसांचा कमी होत चाललेला धाक यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे. शहरात सुरक्षितपणे फिरणेही कठीण झाले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनावरही टीकेची झोड उठत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप होत असून, तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराच्या प्रतिमेलाही तडा जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.

चार आरोपी अटकेत, अटकेदरम्यान गोळीबार
शहरातील श्रीनगर परिसरात सोमवारी पहाटे घडलेल्या खुनी हल्ल्यात शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.घटनेनंतर आरोपी झरी येथील खदानी परिसराकडे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित लोट, अंकुश माने, जोगदंड आणि अंकुश गंदमवार यांचा समावेश आहे. अटकेदरम्यान अंकुश गंदमवार याने स्वतःचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात गंदमवारच्या पायाला गोळी लागली. तो जखमी अवस्थेत घटनास्थळीच कोसळला. त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS