बीड : बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या सर्वच रक्तगटांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जी


बीड : बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या सर्वच रक्तगटांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ यांनी सर्व रक्तगटातील नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचार व शस्त्रक्रियेसाठी येतात. अनेक शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना तत्काळ रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळी रक्त उपलब्ध न झाल्यास उपचार प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण होतात. गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढीत सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोठा आर्थिक भार पडत असून, काही वेळा आवश्यक रक्तगट उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गंभीर परिस्थितीचा विचार करून सर्व रक्तगटातील सक्षम नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हा रुग्णालयात जाऊन रक्तदान करावे, जेणेकरून कोणत्याही रुग्णाला रक्ताअभावी अडचण किंवा धोका निर्माण होणार नाही, असे आवाहन एस.एम. युसूफ यांनी केले आहे.

COMMENTS