रांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज वि

रांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्ज विरोधात चांगलेच वातावरण तापले असून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजपने मंगळवारी झारखंड बंदची हाक दिली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते राज्यातील विविध भागांत रस्त्यावर उतरले असून, सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने सुरू केली आहेत. रांचीमध्ये काही कार्यकर्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रावर चढून आंदोलन करताना दिसून आले. काही ठिकाणी रस्त्यावर टायरी पेटवून वाहतूक अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही भागांत दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्त वाढवला असून, आंदोलन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ मंगळवारी विधानसभेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या विधानसभा इमारतीजवळ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत. त्यांना विधानसभेच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चा पुढे जाण्यापूर्वीच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वाहनांसमोर बसून काही कार्यकर्त्यांनी कारवाईचा निषेध केला. काही जण रस्त्यावर आडवे होऊन आंदोलन करताना दिसले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी घोषणाबाजी करत विरोध केला. सोमवारी रांचीमध्ये हजारो विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. आंदोलनकर्त्यांनी अडथळे हटवत विधानसभेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांना परिसरातून हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी मागे हटण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिसांनी पाण्याचा मारा करत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या लाठीमारात शंभराहून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लाठीमाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. याचदरम्यान काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापला. विशेष म्हणजे हा केक पोलिसांनाही देण्यात आला. काही विद्यार्थी नंतर घरी परतले, तर काहींनी आंदोलनस्थळीच मुक्काम केला. झारखंड बंदमुळे राजकीय संघर्षाला धार विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा आता भाजपने आक्रमकपणे उचलला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध व्हावा, या मागणीसाठी राज्यव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि झारखंडमधील परिस्थितीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी राजधानी दिल्लीतही निदर्शने केली. त्यामुळे झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा आता राज्याच्या राजकारणासोबतच राष्ट्रीय पातळीवरही चर्चेत आला आहे.

COMMENTS