खरवंडी कासार : शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अधिक प्रयत्न करणे आवश्य

खरवंडी कासार : शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. तालुक्यातील खरवंडी कासार येथील भगवान विद्यालयात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, नायब तहसीलदार किशोर सानप, दिग्विजय पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच धनंजय बडे, काशीबाई गोल्हार, वृद्धेश्वरचे संचालक बाळासाहेब गोल्हार, खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील, भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे, नितीन किर्तने, किरण खेडकर, सचिन गायकवाड, वामन किर्तने, रामहारी खेडकर, अंकुश कासुळे, अनिल जाधव, संजय किर्तने, मिडसांगवीचे सरपंच भगवान हजारे, उपसरपंच विष्णू थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. आ. राजळे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. मात्र एकदाच जाऊन काम होईलच याची खात्री नसल्याने शासनाने ‘महसूल समाधान शिबिर’ ही संकल्पना सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या सेवा गावपातळीवर सुलभतेने उपलब्ध होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील विविध मंडळांमध्ये हे अभियान सुरू असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून जमिनीचे ७/१२ दुरुस्ती, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले यांसारखी महत्त्वाची कामे मार्गी लावली जात आहेत. शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.तसेच पानंद रस्त्यांसाठी शासनाकडून प्रति किलोमीटर १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून विकासकामे मार्गी लावावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार किशोर सानप यांनी केले. सूत्रसंचालन किरण केळग्रंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रमसिंग ब्रम्हनाथ यांनी मानले.

COMMENTS