Homeताज्या बातम्या

धावत्या एलटीटी-दिब्रूगड एक्सप्रेसमध्ये बाळाचा जन्म; मध्य रेल्वेच्या ‘रनिंग स्टाफ’च्या तत्परतेने मायलेकाला नवजीवन

मुंबई : मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपून मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने धावत्या रेल्वेमध्ये एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणल

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
युद्धाचा धोका पत्करून ‘ग्रीन आशा’ जहाज मुंबईत दाखल!
पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका
बाळाचा जन्म झाल्यावर कुठे मिळेल दाखला? वाचा...

मुंबई : मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपून मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने धावत्या रेल्वेमध्ये एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणली. गाडी क्रमांक १५९४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रूगड एक्सप्रेसमध्ये नुकताच भुसावळ आणि इटारसी दरम्यान एका महिलेने मुलाला जन्म दिला.

लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रूगड एक्सप्रेसमध्ये रवी चौधरी नावाच्या प्रवाशाने ट्रेनचे कंडक्टर एस. पी. फिरके आणि तिकीट तपासनीस अंबरीश कुमार तिवारी यांच्याकडे धाव घेऊन पत्नी ज्योती चौधरी यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रनिंग स्टाफने तातडीने मदतकार्य सुरू केले. बी-६ डब्याच्या गॅलरीत ब्लँकेट आणि चादरीच्या सहाय्याने स्वच्छ व सुरक्षित जागा तयार करण्यात आली. महिलेला आरामदायी स्थितीत ठेवून आवश्यक ती काळजी घेण्यात आली.

त्यानंतर भोपाळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हरदा स्थानकावर डॉक्टर आणि रुग्णवाहिकेसह तातडीच्या वैद्यकीय मदतीची मागणी करण्यात आली. दरम्यान, रेल्वेमधील महिला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने धावत्या रेल्वेमध्येच महिलेने एका मुलाला जन्म दिला. नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच डब्यातील प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला.

रेल्वेगाडी हरदा स्थानकावर पोहोचल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF), स्थानिक कर्मचारी, महिला कॉन्स्टेबल आणि पॅरामेडिक्सची टीम मदतीसाठी सज्ज होती. त्यानंतर आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते सुरक्षित आहेत.

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता, तत्परता आणि समन्वयामुळे पुन्हा एकदा भारतीय रेल्वे ही केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी सेवा नसून संकटसमयी मदतीला धावून येणारी जीवनवाहिनी असल्याचे अधोरेखित झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

COMMENTS