नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २० मधील असर्जन नाका ते वाघाळा दरम्यानचा डांबरी रस्ता ड्रेनेज लाईनच्या खोदकामामुळे
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २० मधील असर्जन नाका ते वाघाळा दरम्यानचा डांबरी रस्ता ड्रेनेज लाईनच्या खोदकामामुळे पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांसह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
त्रिमूर्ती नगर, विठ्ठल नगर, साईबाबा नगर, श्रीराम नगर आणि सिद्धिविनायक नगर या भागांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता सध्या खड्डेमय व चिखलमय झाला आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सैन्य दलातील जवानांचे कुटुंबीय तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे रोजच्या येण्या-जाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नागरिकांच्या आरोपानुसार, शारदा कन्स्ट्रक्शनकडून ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी चांगला डांबरी रस्ता मधोमध खोदण्यात आला. मात्र कामानंतर रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आली नाही. खोदकामातील काळी माती रस्त्यावरच टाकून काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याने मोठी वाहने व टिपर रस्त्यात अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच ड्रेनेज लाईन टाकूनही अद्याप अनेक ठिकाणी कनेक्शन देण्यात आलेले नाही. काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी स्वखर्चातून रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अवजड वाहतुकीमुळे रस्ता पुन्हा खराब झाला. पावसाळा तोंडावर असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी यात तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

COMMENTS