Homeताज्या बातम्यासंपादकीय

शाईफेक आणि पोलिसांचे निलंबन

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सध्या आपल्याच मंत्रिमंडळा

जागावाटपांतील नाराजीनाट्य
पाणीटंचाईचे संकट
राजकारणातील गाफीलपणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सध्या आपल्याच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे वादात सापडतांना दिसून येत आहे. त्यामुळे जनतेतील रोष वाढत चालला आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री या महत्वाच्या पदाचा कार्यभार असलेले आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील यांच्या तोंडून महापुरुषांचा अवमान करणारे विधान निघावे, याला काय म्हणावे. गेल्या आठवड्यात चंद्रकांत पाटलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाज मनावर झालेल्या परिणामाचा उद्रेक चिंचवड, जि. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान पहावयास मिळाला. निषेध नोंदवण्यासाठी केलेल्या शाईफेकीचे भाजपच्या सरकारने इतके मनावर घेतले आहे की, शाई फेकणार्‍या व्यक्तीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या गृहविभागाला धारेवर धरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच गृहविभागाचे कायदे आता नियमानुसार चालत नसून मंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे चालू लागले असल्याचे आरोप होवू लागले आहेत. दरम्यान, हा प्रकार घडला त्यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या 11 पोलीस कर्मचार्‍यांना निलंबितही करण्यात आले आहे. म्हणजे भाजपच्या पदाधिकार्‍यांसह मंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करून महापुरुषांना घाणेरडी वागणूक द्यायची. तसेच त्यांच्यावर घाणेरडे आरोप करून त्यांच्या कार्यावर शिंतोडे उडवायचे हे प्रकार माणुसकीला पटणारे आहेत का? याचा विचार भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी करण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशासह जगाला घडविण्याचा कानमंत्र देणार्‍या महापुरुषांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रकार ज्ञानी लोकांकडून होवू लागला असल्याचा आरोप आता जानकार करू लागले आहेत. भाजपचे पदाधिकारी हे अभ्यासपूर्ण विधाने करत असल्याचा ज्यांना-ज्यांना प्रत्यय आला होता, असे लोक आता बेताल वक्तव्ये करणार्‍यांबाबत बोलू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीस्मृती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या देशातील वंचित लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. याची दखल जगभरातील साहित्यिकांनी घेतल्याचे पहावयास मिळते. मात्र, आपल्याच मातीत जन्मलेले लोक आपल्याच महापुरुषांचा अवमान करताना भारतमातेलाही मान खाली घालण्याची वेळ राजकारण्यांनी आणली आहे. ज्या भारतमातेच्या जडण-घडणीसाठी महापुरुषांनी आपल्या संसाराची राख-रांगोळी केली अशांवर अशी वेळ राजकारणी आणू लागले आहेत. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीला तर राजकारण्यांनी आता तिलांजली दिल्याचे पहायला मिळू लागले आहे. भारतीय सविधानाने प्रत्येकाला मनासारखे जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, हा अधिकार देताना इतरांच्या हक्कांवर गदा आणता येणार नसल्याचेही बंधन घातले आहे. याचाच विसर आता राजकारण्यांना पडला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी जे घोटाळेखोर म्हणून भाजपचे पदाधिकारी ज्यांचा उल्लेख करत होते. ते आता त्यांच्या मांडीवर जावून बसताच ते स्वच्छ चारित्र्याचे झाल्याचे जनतेने पाहिले आहेत. त्यामुळे विचारधारा जपणारे लोक आता कोणती विचारधारा जपू लागले आहेत, अशी विचारणा जनता करण्यास मागे-पुढे पाहणार नाही. याचा परिणाम आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकीत होण्याची दाट शक्यता आहे. गुजरातमध्ये एकहाती सत्ता येते आणि हिमाचल प्रदेशात का सत्ता आली नाही, हेच यामागील खरे उत्तर असेल असे का म्हणू नये. तसेच स्वत:ची चूक दुरुस्त करण्यापेक्षा सुरक्षा यंत्रणेवर अविश्‍वास दाखवणे हे या सरकारला किती परवडणारे आहे, हे भविष्यात पहायला मिळेल. गृहविभागाने निलंबित केलेल्या 11 पोलीस कर्मचार्‍यांवर केलेली कारवाई किती योग्य हेही तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण सभा-मेळावे यानिमित्त एकत्र येणार्‍या प्रत्येक व्यक्ती हा आयोजकांनी बोलवलेलाच व्यक्ती असेल असे नाही. मंत्री महोदय सामान्य जनतेस भेटण्याची पध्दत कशी बंद करणार? तसेच मेळाव्यांना येणार्‍या व्यक्तीपासून किती दूरून मंत्री महोदयांनी बोलायचे याबाबत कोणतीही नियमावली नसल्याचे पहावयास मिळते. जर असेलच तर ती सर्व लोकांना लागू करणार का? असा सवालही उपस्थित होत आहे.

COMMENTS